>> सुमेध रानडे (टॅरो कार्ड रीडर, पुणे)
२ ते ८ जुलैचे साप्ताहिक भविष्य
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी लोकांकडून चांगला आधार, मदत आणि पाठिंबा घेऊन येत आहे. इतरांवर अवलंबून असलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा नातेवाईक, मदतीसाठी तयार असणारे सज्जन लोक तुम्हाला भेटतील. त्यांच्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला एखादी लहान भेटवस्तू मिळू शकते. कामामध्ये कौतुक होऊ शकतं. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला गरजेची मदत मिळेल आणि तुम्ही एक पुढचा टप्पा गाठू शकता.
ज्यांच्याशी तुमचं काही कारणास्तव भांडण किंवा वाद झाला असेल, अशा लोकांशी सलोखा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्या जवळच्या माणसांना तुमचं म्हणणं मोकळेपणाने सांगा, त्याने तुमचं नातं घट्ट व्हायला मदत होईल. घरातल्यांसोबत थोडा निवांत वेळ घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. तुमच्या सारख्या मनात येत असलेल्या जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला फोन करा, त्यांना जमेल तशी मदत करा. ग्रहणशील रहा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देणारा आहे. तुम्हाला जे मिळवायचं आहे, ते आता बऱ्यापैकी तुमच्या टप्प्यात येणार आहे. तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी जे काही साधन लागणार आहे, ते तुमच्या पुढ्यात येणार आहे. तुमचा आत्मविश्वास चांगला राहील, इच्छाशक्ती भक्कम राहील. कोणतीही समस्या सोडवायला तुम्हाला योग्य मार्ग सुचतील. जरी तुम्ही एकटे असाल, तरी तुम्हाला सशक्त वाटेल. तुम्ही तुमचं या आठवड्याचं ध्येय गाठाल अशी खूप शक्यता आहे.
सगळी संसाधनं सोबत असताना, तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे त्यांचा योग्य उपयोग. काहीही वाया घालवू नका आणि कशाचाही अतिवापर करू नका. सगळ्या गोष्टी योग्य चोख प्रमाणात वापरा. थोडेसे अडखळत असाल तर बुद्धीने निर्णय घ्या, भावनांमध्ये अडकू नका. ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेबद्दल लवचिक आणि चपळ जरूर रहा पण मूळ ध्येयाच्या बाबतीत अगदी एकाग्र रहा. वेळ वाया घालवू नका, लक्ष हलवू नका.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी थोडा कठीण असणार आहे. तुम्ही अशा परिस्थितीत अडकाल ज्यात तुम्हाला तुमच्या जागेवर पाय घट्ट रोवून उभं रहावं लागेल. काही लोक, काही स्पर्धक तुम्हाला तुमच्या जागेवरून खाली आणण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाऊ शकाल. तुम्ही या काहीशा अवघड परिस्थितीवर तुमच्या जिद्दीने नक्कीच यश मिळवू शकता. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. संथपणे का असेना पण तुम्ही तुमच्या कामात पुढे वाढणार आहात.
तयार व्हा, आत्ता वेळ आहे ती येणाऱ्या परिस्थितीला धीराने सामोरे जाण्याची, तुमचं सर्वोत्तम देण्याची. काळजीपूर्वक पुढचे पाऊल टाका. धीट व्हा, घाबरण्याची गरज नाही. स्वतःच स्वतःसाठी उभे रहा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. हा विश्वास ठेवा की तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळी ताकद आहे ज्याने तुम्हाला ही परिस्थिती जिंकता येईल. स्वतःला पुन्हा नव्याने सिद्ध करा. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा.
श्रीस्वामी समर्थ!!