>> सुमेध रानडे, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन२५ जून ते १ जुलै
नंबर १:हा सप्ताह वास्तविक कृती करण्यापेक्षा त्याबद्दलचं नियोजन आणि त्याबाबतचे काही निर्णय घेण्याचा आहे. तुमच्याकडे कुठली तरी संकल्पना किंवा काम आहे, जे आता तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे, ज्याचा विस्तार करायचा आहे. तुम्हाला जिद्दीने आणि आत्मविश्वासाने काही गोष्टी पुढे न्याव्या लागतील. तुम्हाला लोकांचा आधार आणि मदत मिळणार आहे.
एक मोठा दृष्टिकोन ठेवा. सगळे पर्याय नीट पडताळून पहा. पर्यायांमुळे गोंधळून जाऊ नका, उलट त्यांचा अभ्यास करून त्यांच्यातून महत्त्वाची माहिती मिळवा. नियोजन महत्वाचं आहे, म्हणून कामाचं स्वरूप आखून ठेवा. बारकावे सुद्धा लक्षात घ्या. काम सुरू करायची घाई करू नका. तुमच्याकडे हे सगळं करण्यासाठी लागणारी ऊर्जा नक्कीच आहे!
नंबर २:
हा सप्ताह तुमच्या साठी थोडा आरामाचा असणार आहे. तुम्ही पूर्वी बरेच श्रम केले आहेत, आता या आठवड्यात तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला मिळतील. तुम्हाला तुमचा स्वतंत्र वेळ मिळेल, या निवांतपणात तुम्ही आत्मपरीक्षण करू शकाल आणि काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करू शकता. तुम्ही भौतिक सुखात आरामात असाल.
हा वेळ निवांत घालवा. एकटे असताना कोणत्याही गोष्टीचा अतीविचार करू नका. हा वेळ आत्मपरीक्षण आणि स्वतः मधे सुधारणा करण्यासाठी वापरा. जरी तुमच्याकडे चांगली संपन्नता असली तरी वस्तूंचा अतिरेक वापर करू नका. गरजेपुरताच वापर करा. आनंद उपभोगताना अत्यंत विनम्र रहा, जमिनीवर रहा, कसलाही दिखावेपणा करू नका!
नंबर ३:हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. तुम्ही अशा परिस्थितीत अडकाल ज्यात तुम्हाला तुमच्या जागेवर पाय घट्ट रोवून उभं रहावं लागेल. काही लोक, काही स्पर्धक तुम्हाला तुमच्या जागेवरून खाली आणण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जाऊ शकाल. म्हणून विकट प्रसंग आला तरीही तुम्ही तुमची जागा टिकवू शकणार आहात.
सज्ज व्हा, आत्ता वेळ आहे ती येणाऱ्या परिस्थितीला धीराने सामोरे जाण्याची, तुमचं सर्वोत्तम देण्याची. तुमच्यातली ताकद ओळखा. धीट व्हा, घाबरु नका. स्वतःच स्वतःसाठी उभे रहा, दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. हा विश्वास ठेवा की तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी वेगळे सामर्थ्य आहे ज्याने तुम्हाला ही परिस्थिती जिंकता येईल. ही एक संधी आहे स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची!