>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन3 ते 9 सप्टेंबर===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या समोर अशा घटना घडतील, किंवा अशी परिस्थिती येईल जिथे तुमच्या धैर्याचा आणि संयमाचा पूर्ण कस लागेल. तुम्हाला हव्या तशा वेगाने गोष्टी घडणार नाहीत, हे आत्ताच मनाला सांगा, याची तयारी ठेवा. विलंब होऊ शकतो, जे मिळायला हवं, त्यात काहीतरी कमी राहू शकतं, काहीतरी उणीव राहू शकते. कुठेतरी तुम्हाला मध्यस्ती करावी लागू शकते. तुम्हाला गरजे पुरतं मिळेल पण त्याहून जास्त नाही. मध्यम फलदायी असा हा सप्ताह राहील.
या आठवड्यात तुम्ही धैर्य ठेवा, संयम ठेवा. कोणत्याही परिस्थितीत चिडचिड करू नका. उलट तुमच्या आजूबाजूला लोक चिडचिड करत असतील तर त्यांना शांत करा. कोणी चिडून बसलं असेल तर त्याची समजूत काढा. सगळयांना एकत्र घेऊन पुढे चाला. तुम्ही स्वतः कोणताही पक्ष किंवा कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका. भांडणात सुवर्ण मध्य काढा. मध्यम मार्ग निवडा. संथ गतीने वाटचाल करा, घाई गडबड करू नका. सगळ्या पसाऱ्यातून चांगलं काय ते निवडा आणि त्यातून तुमचं उत्तम काहीतरी तयार करा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडणार नाहीत. वादविवाद, स्पर्धा, मतभेद, भांडणं आणि गुंतागुंतीचे प्रसंग संभवतात. नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये कोणाशी तरी भांडण होऊन नुकसान होण्याचे संभवत आहे. घरामध्ये, कुटुंबामध्ये मतभेदातून अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. एखादी न आवडणारी, न पटणारी गोष्ट करावी लागू शकते. तुम्हाला हवा तसा सहकाऱ्यांचा किंवा आप्तेष्टांचा पाठिंबा मिळणार नाही. पण तुम्ही जिद्दीने आणि स्वबळावर प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्याल.
या आठवड्यात तुम्ही शांत राहायचं आहे. उग्रपणे, अविचाराने निर्णय घेऊ नका. लोकांचे मत तुमच्या बाजूने नसल्याने जरा धीराने पुढे चाला. तुमच्या हाताबाहेर असलेल्या गोष्टींमध्ये फार लक्ष घालू नका, वाद किंवा भांडणं स्वतःहून ओढवून घेऊ नका. थोडाफार विरोध करा, पण अतिरेक लढायला जाऊ नका, त्यातून निष्पन्न निघेल अशी अपेक्षा ठेवू नका. टोकाच्या प्रसंगात समतोल राखा. तडकाफडकी काहीही करू नका. मानसिक त्रास होत असेल तर ध्यान, मेडीटेशन, मित्रांचा, कुटुंबाचा आधार घ्या.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी कष्ट करण्याचा आहे. चिकाटीने कष्ट करावे लागतील. कुठलीतरी आवडीची घटना घडायला किंवा केलेल्या प्रयत्नांना यश मिळायला वेळ लागेल. वाट पहावी लागेल. लगेच प्रश्न सुटणार नाहीत. गोष्टी पटापट पुढे सरकणार नाहीत. संयम आणि धैर्याचा कस लागेल. मध्येच अडकल्यासारखं वाटेल. संसाधने मुबलक असतील पण तरीही काहीतरी कमतरता जाणवेल. थांबून रहावं लागेल, इतरांवर अवलंबून राहावं लागेल. त्यामुळे मनात खिन्नता येऊ शकते. सगळं असून देखील आनंद कमी वाटू शकतो.
या आठवड्यात तुम्ही घाई गडबड न करता शांतपणे परिस्थितीचा सामना करण्याची गरज आहे. सावकाश पुढे चाला. आहे तिथेच राहिलात तरी चालेल पण तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका. खूप कष्ट करा, खूप मनापासून प्रयत्न करा. पण केलेल्या कष्टाचं फळ लगेच मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका, फळ मिळायला उशीर होईल. फळ मिळेल हे निश्चित पण विलंब होईल. हलगर्जीपणा टाळा. संयम ठेवा. तुमच्याकडे असलेल्या गोष्टींकडे बघा आणि त्यात आनंद माना. गुंतवणूक विचारपूर्वक खात्रीशीर ठिकाणी करू शकता.
श्रीस्वामी समर्थ.