>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१४ ते २० एप्रिल===============
नंबर १:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येत आहे. तुमच्यातील जिद्द, धाडस, काहीतरी करून दाखवण्याची वृत्ती, या सगळ्यांचा उपयोग करुन तुम्हाला हवं असलेलं काहीतरी मिळण्याची शक्यता आहे, किंवा त्याबाबतीत सकारात्मक घटना घडतील. इतरांकडून मान सन्मान आणि सहकार्य मिळेल. लोकांना तुमचा सहवास आवडेल. "अजि सोनियाचा दिनु", साधारण असा काळ आहे!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही उत्साहयुक्त राहण्याची गरज आहे. काहीही झालं तरी खचून जाऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. इतरांना सुद्धा प्रेरणा द्या. लढण्याची वृत्ती ठेवा पण कोणाशी विनाकारण भांडू नका. स्पर्धा जिंकण्यापेक्षा काम असं करा की तुम्ही इतरांचं मन जिंकाल. आत्मविश्वास, प्रसंगावधान आणि खेळाडू वृत्ती ठेवा. चांगले नेतृत्व करा.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी काहीसा अवघड असणार आहे. काही बाबतीत तुमची परीक्षा घेतली जाऊ शकते. तुमचा संयम, तुमचा सात्विक भाव आणि तुमची सचोटी या गोष्टींना धक्का लागण्याचे प्रसंग येऊ शकतात. काही कामे रखडली जाऊ शकतात. काही प्रमाणात हतबल झाल्यासारखं वाटू शकतं. पण काळजी करू नका, हे सगळं सहन केल्यावर पुढे चांगले बदल घडतील. येणार्या पहाटेसाठी आजची रात्र गरजेचीच असते हे लक्षात ठेवा!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही स्वतःला कणखर बनवण्याची गरज आहे. कुठल्याही आमिषाला भुलू नका. लाचारी पत्करू नका. सात्विक मनाला योग्य वाटत नसेल ते काम अजिबात करू नका. एवढासा सुद्धा नियम मोडू नका. आखलेल्या चौकटीतंच वागा. जोखीम उचलू नका. काही प्रमाणात आहे त्या भौतिक वस्तूंचा उपभोग घ्या. कोणत्याही वरवर चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. व्यसनात गुंतू नका.
नंबर 3:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी लोकांकडून चांगला आधार, मदत आणि पाठिंबा घेऊन येत आहे. इतरांवर अवलंबून असलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा नातेवाईक, मदतीसाठी तयार असणारे सज्जन लोक तुम्हाला भेटतील. तुम्हाला एखादी लहान भेटवस्तू मिळू शकते. कामामध्ये कौतुक होऊ शकतं. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्ही एक पुढचा टप्पा गाठू शकता!
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही लोकांशी सलोखा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्या जवळच्या माणसांना तुमचं म्हणणं मोकळेपणाने सांगा, त्याने तुमचं नातं घट्ट व्हायला मदत होईल. घरातल्यांसोबत थोडा निवांत वेळ घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. तुमच्या जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला फोन करा, त्यांना जमेल तशी मदत करा. ग्रहणशील रहा. मन जिंकून जग जिंका!
श्रीस्वामी समर्थ.