>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन११ ते १७ फेब्रुवारी===============
क्रमांक १:
हा सप्ताह तुमच्यासाठी खोळंबलेला काळ घेऊन येत आहे. गोष्टी अडकल्यासारख्या वाटतील. पटापट काही घडणार नाही. त्यामुळे तुम्हाला बेचैन वाटू शकतं. कामाच्या ठिकाणी तेच तेच काम करुन कंटाळा येण्याचा संभव आहे. मनातून उत्साह आणि ऊर्जा कमी राहील. संतोष आणि समाधान हे तुमच्या मानण्यावर राहील.
या आठवड्यात तुम्ही तुमच्याकडे जे चांगलं आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जे नाही त्यामुळे स्वतःला त्रास करुन घेण्यापेक्षा आहे त्यात आनंद मानायला शिका. इतरांमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर संयम ठेवा, माणसं आणि नाती पटकन तोडायला जाऊ नका. विवेकाने विचार करा. कृतज्ञ रहा, कृतज्ञतेचा सराव करा.
क्रमांक २:
हा सप्ताह तुमच्यासाठी मिश्र स्वरूपाचा असणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत पोचाल पण तरीसुद्धा समाधान मिळणार नाही. आणखी पुढे काहीतरी करायला हवं अशी भावना येईल. भौतिक सुखसोयींपासून एक प्रकारची विरक्ती येऊ शकते. कंटाळा येऊ शकतो. कामामध्ये विलंब होऊ शकतो. ध्येपूर्तीसाठी सोपी वाट मिळणार नाही.
या आठवड्यात तुम्ही तुमच्या मनाशी एकनिष्ठ राहायचं आहे. खरंच तुम्हाला नक्की काय हवं आहे, याचा नीट विचार करा आणि त्याप्रमाणे पुढे चाला. उथळ गोष्टींमध्ये अडकून राहू नका. भावनांमध्ये, भूतकाळात किंवा नैराश्यात अडकून राहू नका. मागे घडलेलं काहीतरी एकदाचं सोडून द्या. कुठेही खूप गुंतू नका.
क्रमांक ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी काही अडचणींचा आणि अडथळ्यांचा असणार आहे. कुठेतरी सारखे अडकत आहात असं वाटेल. संभाषण व्यवस्थित होणार नाहीत, व्यवहार चोख होणार नाही. तुम्ही एकटे पडल्यासारखं वाटू शकतं. ताणतणाव जास्त जाणवू शकतो. पण या सगळ्यात, थोड्या प्रमाणात का असेना, तुम्ही पुढे वाढणार आहात.
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सकारात्मकतेचा कस लावावा लागणार आहे. तुम्ही स्वतः स्वतःला बांधून घेतलं आहे का, स्वतःच स्वतःचं खच्चीकरण करत आहात का, याकडे लक्ष द्या. न्यूनगंड बाळगू नका. संकटं आली तरी हातपाय गाळून बसू नका. तुमच्याकडे कौशल्य आहे, शक्ती आहे, त्यांचा नीट वापर करा. परस्थितीशी लढा.
श्रीस्वामी समर्थ.