>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन5 ते 11 नोव्हेंबर===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी उर्जायुक्त असणार आहे. तुम्ही तुमच्या ध्येयपूर्तीसाठी एक पाऊल पुढे टाकू शकणार आहात. झटपट घडामोडी घडू शकतात. तुमच्या नोकरीत, व्यवसायात किंवा घरातील आवडीच्या कामात एक प्रकारे नवीन चांगली चालना मिळेल. अडथळे येतील पण त्यावर तुम्ही कुशलतेने मात करू शकाल. तुमचा झेंडा रोवण्याचा हा काळ आहे. काही प्रवास घडू शकतात त्यातून तुम्हाला आनंद होईल.
या आठवड्यात तुम्ही तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्यावर एकाग्रपणे काम करा. लक्ष विचलित होऊ देऊ नका. असं करताना तुम्ही थोडे स्वार्थी विचार करू शकता, पण ते कटाक्षाने टाळा. इतरांना देखील घेऊन पुढे चाला. बाकीच्यांचे मत ऐकून घ्या. काही प्रमाणात तुमचं वर्चस्व दाखवा पण त्याचा अतिरेक नको. तुम्हाला आतून जे योग्य वाटतंय, जे पटतंय तेच करा. आळस अजिबात नको.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी खूप काम आणि कष्ट करण्याचा असणार आहे. जे करत आहात त्यात तुम्हाला प्राविण्य मिळेल. लोकांकडून कौतुकाच्या किंवा मान सन्मानाच्या अपेक्षा ठेवू नका. कदाचित तुम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळणार नाही. पण तुम्ही संपन्न आणि आनंदी रहाल. तुमच्या कुठल्यातरी भौतिक, आर्थिक ध्येयाच्या दिशेने चांगली वाटचाल कराल. काम परिपूर्णतेकडे जाईल.
या आठवड्यात तुम्हाला बाकी कसलाही विचार न करता पूर्ण लक्ष तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आहे. भरपूर कष्ट करा. वैयक्तिक गोष्टींत खूप वेळ अडकू नका. वेळ वाया घालवू नका. एखाद्या कामात कौशल्य मिळवा. चुका दुरुस्त करून, सुधारणा करा. काम एकदम चोख करा. संयम आणि स्थैर्याने काम करा. सगळ्यांपेक्षा एकट्याने काम करा. स्वावलंबी व्हा.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी वेगवान असणार आहे. खूप पटापट गोष्टी घडतील. अडकलेली कामे पुढच्या टप्प्यापर्यंत पोचू शकतात. ध्येयाकडे चांगली वाटचाल होईल. सतत काहीतरी हालचाल किंवा सतत कुठल्यातरी घडामोडी घडतील. त्यामुळे थोडं अस्थिर आणि अस्वस्थ वाटू शकतं. काही उद्धट किंवा सडेतोड बोलणाऱ्या व्यक्तींशी सामना होईल. एखादा वाद, मतभेद होऊ शकतात.
या आठवड्यात तुम्ही धडाडीने, विश्वासाने आणि प्रखरपणे पुढे चालण्याची गरज आहे. तुमचे विचार स्पष्टपणे मांडा, रोखठोक वागा, मुळमुळीत राहू नका. पण असं करत असताना संबंध तोडू नका, किंवा दुसऱ्यांना दुखवू नका. सत्याचीच बाजू घ्या. बुद्धीचातुर्य वापरा. तुमचं तेच बरोबर आणि बाकी सगळ्यांचं सगळं चूक असं भाव ठेवू नका. वेळ गाठा, विलंब नको, जलद गतीने काम करा.
श्रीस्वामी समर्थ.