>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन8 ते 14 ऑक्टोबर===============
नंबर 1:
हा सप्ताह तुमच्यासाठी काही अडचणींचा आणि अडथळ्यांचा असणार आहे. ज्या मार्गावर चालत आहात, तिथे मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत. वेगाने गोष्टी घडणार नाहीत. कुठेतरी सारखे अडकत आहात असं वाटेल. काही समस्या समोर येतील ज्यांच्यामुळे काम पूर्ण करायला उशीर होईल. संभाषण व्यवस्थित होणार नाहीत, व्यवहार चोख होणार नाही. तुम्ही एकटे पडल्यासारखं वाटू शकतं. पण या सगळ्यात, अगदी थोड्या प्रमाणात का असेना, तुम्ही पुढे वाढणार आहात हे नक्की.
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सकारात्मकतेचा कस लावावा लागणार आहे. तुम्ही स्वतःच स्वतःला बांधून घेतलं आहे का, स्वतःच स्वतःचं खच्चीकरण करत आहात का, याकडे लक्ष द्या. आत्मबल ठेवा. न्यूनगंड बाळगू नका. संकटं आली तरी हातपाय गाळून बसू नका. तुमच्याकडे कौशल्य आहे, शक्ती आहे, त्यांचा नीट वापर करा. लढण्याच्या आधीच पराजय स्वीकारू नका. तुमचे पूर्ण प्रयत्न करा. एकाच बाजूने विचार न करता, मोठा विचार करा.
नंबर 2:
हा सप्ताह तुमच्यासाठी काहीतरी नवीन करून दाखवण्याचा आहे. एखादं नवीन काम मिळू शकतं. कामात बदल होऊ शकतात. आवडीचं काहीतरी करायला मिळू शकतं. किंवा तेच काम नव्याने करण्याची संधी मिळू शकते. आत्तापर्यंत ज्याची वाट पाहत होता, ती घटना घडू शकते, किंवा त्या घटनेसंदर्भात चांगली बातमी मिळू शकते. केलेली मेहनत फलित होईल, चांगल्या प्रकारे पुढे वाटचाल करू शकाल. तुम्हाला आतून ऊर्जा मिळेल, जिद्द राहील, उत्साही वाटेल.
या आठवड्यात तुम्ही तुम्हाला हवं ते काहीतरी नवीन करू शकता. एखादा प्रयोग, एखादं नवखं काम हाती घेऊ शकता. नवीन काहीतरी शिकू शकता. तुमची कला, क्रीडा, छंद लोकांसमोर सादर करा. काहीतरी वेगळं, नेहमीच्या चौकटीच्या बाहेरचं करण्यासाठी हा काळ पोषक आहे. लहान मुलांसारखा विचार करा, त्यातून नव्या संकल्पना मिळू शकतील. तुम्हाला सगळं काही येतं हा विचार सोडा आणि विनम्रपणे, पाय जमिनीवर ठेवून इतरांसमोर व्यक्त व्हा.
नंबर 3:
हा सप्ताह तुमच्यासाठी लोकांकडून चांगला आधार, मदत आणि पाठिंबा घेऊन येत आहे. इतरांवर अवलंबून असलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जुने मित्र किंवा नातेवाईक, मदतीसाठी तयार असणारे सज्जन लोक तुम्हाला भेटतील. त्यांच्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला एखादी लहान भेटवस्तू मिळू शकते. कामामध्ये कौतुक होऊ शकतं. तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला गरजेची मदत मिळेल आणि तुम्ही एक पुढचा टप्पा गाठू शकता.
या आठवड्यात ज्यांच्याशी तुमचं काही कारणास्तव भांडण झालं असेल, अशा लोकांशी सलोखा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्या जवळच्या माणसांना तुमचं म्हणणं मोकळेपणाने सांगा, त्याने तुमचं नातं घट्ट व्हायला मदत होईल. घरातल्यांसोबत थोडा निवांत वेळ घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. तुमच्या सारख्या मनात येत असलेल्या जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला फोन करा, त्यांना जमेल तशी मदत करा. ग्रहणशील रहा.
श्रीस्वामी समर्थ.