>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१० मार्च ते १६ मार्च===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी बुद्धीचे प्राधान्य घेऊन येत आहे. मनापेक्षा बुद्धीचा वापर करावा लागेल. बुद्धीचातुर्य दाखवावं लागेल. महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, महत्वाचे संवाद घडतील. घरात किंवा नोकरीमध्ये लोकांचा प्रभाव राहील, दबदबा राहील. रुक्ष आणि रोखठोक वागणाऱ्या लोकांशी जुळवुन घ्यावं लागेल. कामामध्ये संकल्पना आखल्या जातील, नियोजन चांगले होईल.
या आठवड्यात तुम्हाला तुमचं बोलणं, एकदम स्पष्ट ठेवण्याची गरज आहे. जे बोलाल ते आत्मविश्वासाने बोला आणि तसं वागा. अगदी सचोटीने वागा. संशयाला, खोट्याला अजिबात जागा ठेवू नका. तुमच्या हाताखाली असलेल्यांना प्रामाणिक मार्गदर्शन करा. मोठ्यांसमोर नमतं घ्या. पक्षपात करू नका. नीट सारासार विचार करून, कोणा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन मग निर्णय घ्या.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला फलदायी ठरणार आहे. अपेक्षित यश मिळण्याच्या मार्गावर आहे. जे काही करत आहात त्यातून चांगले निष्पन्न निघणार आहे. थोडा विलंब होऊ शकतो पण परिणाम चांगला मिळेल. तुमच्या सप्ताहात स्त्रियांचं वर्चस्व राहील. भाग्याची साथ राहील. अडकलेली कामे पुढे सरकतील. एखाद्या कलेतून आनंद मिळेल. एखादी सुप्त इच्छा पूर्ण होईल.
या आठवड्यात तुम्ही तुमचा खर्च सांभाळण्याची गरज आहे. उधळपट्टी बंद करुन पैशाचे नीट नियोजन करण्याची गरज आहे. त्याचबरोबर स्वार्थी विचार न करता इतरांना देखील लागेल तशी मदत करण्याची गरज आहे. आज जे पेराल तेच उद्या उगवेल, ही उक्ती तुम्ही या आठवड्यात लक्षात ठेवा. त्यामुळे चांगल्या गोष्टीत गुंतवणूक करा. विनाकारण धरलेला राग द्वेष सोडा आणि सलोखा करा.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी अवघड परिस्थिती आणतो आहे. मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत. अपेक्षित यश अपेक्षित गती मिळणार नाही. त्यामुळे काहीही करण्याची इच्छा कमी झालेली असेल. मनासारखे घडणार नाही त्यामुळे तुमचे विचारचक्र सुरु होईल आणि तुम्ही त्यात अडकण्याची शक्यता आहे. एक प्रकारची परीक्षा होईल. त्यात तुम्ही संयम आणि समतोल राखलात तर येणारा काळ चांगला जाईल.
या आठवड्यात तुम्ही कोणतेही नवीन काम सुरु करु नका. आहे ते नीट चालू ठेवा. मोठे निर्णय घेऊ नका. अंगावर जबाबदारी ओढवून घेऊ नका पण स्व कर्तव्याला देखील चुकू नका. इतरांच्या बोलण्याने, इतरांच्या वागण्याने स्वतःला त्रास करुन घेऊ नका. त्याने तुमचा वेळ आणि शक्ती वाया जाईल. मनाप्रमाणे काही घडले नाही तरी सुद्धा तुम्ही सकारात्मक राहून या काळातून तरून जाणे गरजेचे आहे.
श्रीस्वामी समर्थ.