>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन३१ मार्च ते ६ एप्रिल===============
नंबर १:
काय घडू शकते? हा सप्ताह तुमच्यासाठी तुमच्या हिंमतीचा कस लावणारा असणार आहे. जे काही करत आहात त्यात तुमच्या धडाडीची आणि स्वबळाची परीक्षा होऊ शकते. शेवटच्या टप्प्याजवळ कुठेतरी काहीतरी अडथळा येऊ शकतो, काहीतरी कारणामुळे अडकू शकता. ध्येयामध्ये अपेक्षेपेक्षा कमी यश मिळेल पण तुमच्या हिंमतीने तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पोचणार आहात यावर विश्वास ठेवा.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. जिद्दीने, जोमाने आणि चिकाटीने पुढे चाला. मनाची डगमग होऊ देऊ नका, घाबरु नका. घाई गडबड न करता विचारपूर्वक काम करा. कुठल्याही जुन्या वाईट अनुभवामुळे स्वतःचं खच्चीकरण करू नका. शरीर स्वास्थ्याकडे नीट लक्ष द्या. तुम्ही आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहात हे स्वतः मनात पक्के करा.
नंबर २:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी उत्साहाचा आणि आनंदाचा आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं. अडकलेल्या गोष्टी काही प्रमाणात पुढे सरकतील. दुरावलेली नाती पुन्हा नव्याने जवळ येतील. एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. काहीतरी चांगले घडेल आणि तुम्हाला समाधान लाभेल. लहान मुलांमध्ये मन रमेल. तुम्हाला आतून सकारात्मक आणि तजेलदार वाटेल.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्हाला भावनिक पातळीवर आनंद देणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत. एखादी कला आत्मसात करा, काही संबंध बिघडले असतील तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करा. इतरांना आनंद द्या. लहान मुलं जशी निरागसपणे माफी मागून आणि माफ करून सोडून देतात तसं तुम्हाला वागण्याची गरज आहे. चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं या प्रमाणे मन आनंदी ठेवलंत तर घर आनंदी राहील हे लक्षात ठेवून वागा.
नंबर ३:
काय घडू शकते?हा सप्ताह तुमच्यासाठी धैर्य आणि संयमाचा कस लावणारा असणार आहे. तुमच्यातील चांगुलपणाची एक प्रकारे परीक्षा घेतली जाऊ शकते. पण तुम्ही जर या परीक्षेत उत्तीर्ण झाला तर पुढचा मार्ग निश्चितच सोपा होईल. या काळात तुम्हाला यश मिळवणे अवघड वाटू शकेल पण मनाच्या ताकतीने तुम्ही बरेच काही मिळवू शकता. म्हणून अत्यंत प्रयत्नशील रहा.
तुम्ही काय करावे?या आठवड्यात तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्यावर संयम ठेवण्याची गरज आहे. नियमसंयम ठेवून वागलात तर तुम्हाला तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोचणे सोपे जाईल. वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा हा काळ आहे. राग लोभ मत्सर अशा तमोगुण प्रधान वृत्तीवर शुद्ध सात्विक शांत भावनेने मात करा. शांततेचा मार्ग निवडणे म्हणजे सुध्दा एक प्रकारचे धाडसाचे काम आहे हे विसरु नका.
श्रीस्वामी समर्थ.