>> सुमेध रानडे, टॅरो कार्ड रीडर, पुणे
साप्ताहिक टॅरो मार्गदर्शन१८ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी===============
नंबर १:
हा सप्ताह तुमच्यासाठी वेगवान आहे. तुमच्या समोर अशा घटना घडतील जिथे तुम्हाला सचोटीचा, संवाद कौशल्याचा उपयोग करावा लागेल. तुमच्या कामात तुम्हाला नवीन संकल्पना सुचतील. थोडे मतभेद आणि वादविवाद देखील संभवतात. तुमचं बुद्धीचातुर्य उठून दिसेल. लढण्याची वृत्ती कामी येईल. अनपेक्षित बातमी येऊ शकते.
या आठवड्यात अतिशय प्रामाणिकपणे वागा, खरेपणा मुळीच सोडू नका. तुमचं मत स्पष्टपणे कोणालाही न घाबरता किंवा कुठलेही दडपण न घेता मांडा. नवीन बदल घडवू शकता. तुमच्या डोक्यात सुरू असलेल्या संकल्पना आणि विचार इतरांना सांगा. हाती घेतलेलं काम, सारासार बुद्धीने हाताळा. वादाच्या प्रसंगी संयम ठेवा.
नंबर २:
हा सप्ताह तुमच्यासाठी संभ्रम निर्माण करणारा वाटू शकतो. अनेकविध विचारांनी मनावर परिणाम होऊ शकतो. निर्णय घेणं अवघड वाटू शकतं. तुम्ही ठरवलेल्या कामात किंवा तुम्ही आखलेल्या नियोजनात फार गती येणार नाही. एक प्रकारची स्तब्धता येऊ शकते. गोष्टी हव्या तशा पुढे सरकणार नाहीत. अकारण विलंब होऊ शकतो.
या आठवड्यात तुम्ही शांत बसून, तोलून मापून विचार करून पुढे जाण्याची गरज आहे. निर्णय घेताना बुद्धीने, सारासार विचार करून घ्या. भावनेच्या भरात किंवा कोणाच्या प्रभावाखाली येऊन काहीही करू नका. एकाग्रपणे काम करा. सगळ्यांच्या सोबतीपेक्षा एकट्याने काम करा. ध्यान, उपासना करा.
नंबर ३:
हा सप्ताह तुमच्यासाठी नवीन आनंद, घेऊन येत आहे. तुम्ही जे करत आहात, त्यामध्ये एक पाऊल पुढे टाकणार आहात. अडकलेले काम सुटेल. मोकळेपणाने तुमच्या भावना व्यक्त केल्या तर चांगला मार्ग निघेल. समस्या पूर्ण नाही सुटली तरी ती कशी सोडवता येईल याचा अंदाज येईल. एकूण परिस्थिती सुधारेल. तब्येत चांगली होईल.
या आठवड्यात तुम्ही बुद्धीपेक्षा मनाने काम करण्याची गरज आहे. तुमचं अंतर्मन काय सुचवत आहे, तुम्हाला आतून काय वाटत आहे ते ऐकण्याची गरज आहे. लोकांशी चांगले, सद्भावनांचे संबंध ठेवा. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या विषयात नवीन सुरुवात करा. कृतज्ञता बाळगा.
श्रीस्वामी समर्थ.