भारताचे माझी राष्ट्रपती व तत्वचिंतक , अभ्यासक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आज जन्मदिन हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्यांचा जन्म आंध्रप्रदेशातील तिरुत्तनी येथे झाला.मद्रास येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले. कलकत्ता विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले कालांतराने ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले.तसेच राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहीले. इ.स. १९४९ ते ५२ या काळात ते राशियाचे राजदुत म्हणून काम पाहिले आहे याच काळात स्टॉलीन व त्यांची भेट झाली स्टॉलीनने नेहमीची प्रथा मोडत अर्थात सर्व प्रोटोकॉल तोडत श्री राधाकृष्णन यांना आपल्या भेटीस बोलवले होते असा उल्लेख वाचाण्यास मिळतो. अ.भा तत्वज्ञान परिषद व अ.भा.शिक्षण परिषदेचे अध्यक्षीय स्थान ही त्यांनी भुषविले. पहिल्या शिक्षण आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी मुल्य शिक्षणावर जास्त भर देत भारतीय संस्कृतीला साजेसा विद्यार्थी निर्माण व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले तसेच त्यांच्या ग्रंथ लेखनाची प्रेरणाही हीच होती.
तर्कशुद्ध संभाषणचार्तुय हे डॉक्टकरांचे वैशिष्ट्य होते. म.गांधी व त्यांच्यातील चेन्नई येथील शाकाहार व मांसाहार यावरील वाद असो व १९६५ मध्ये भारत पाक युद्धाच्या संदर्भात अमेरिकन राष्ट्राध्यक्षासोबत झालेला संवाद असो या घटना वाचनीय आहे. त्यांचा पिंड सरळ, प्रांजळ तत्वचिंतकाचा होता. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रातही डॉक्टरांच्या संदर्भात काही प्रेरणादायी आठवणी आहेत . भारतीय विद्याभवनाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ब्रम्हविद्याभास्कर तर करवीर पीठाच्या शंकराचार्य यांनी ज्ञानर्षी म्हणून गौरविले "एनसायक्लोपिडीया ब्रिटनिका या इंग्रजी विश्वकोशात भारतीय तत्वज्ञानावरील टिपण ही डॉक्टरांच्या साहित्यातून घेतील आहे.
आपल्या लिखाणात श्री शंकराचार्यांच्या अद्वैत मताचा पुरस्कार करत त्यावर आधुनिक काळातील विचारांचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल असे त्यांनी आपल्या विविध ग्रंथातुन मांडण्याचा प्रयत्न केला. श्री राधाकृष्णन् यांनी अद्वैतातील मायावादाचा जोरदार पुरस्कार केला आहे. मात्र द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी या इ स. १९२० मध्ये प्रकाशीत झालेल्या त्यांच्या या ग्रंथात मनाचा कल रामानुजांच्या विशिष्टाद्वैत मताकडे म्हणजे सगुणोपासनेकडे वाकलेला दिसतो. पुढे मात्र इ.स. १९२३ या साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंड रुपात प्रकाशीत झालेल्या ग्रंथात शंकराचार्याचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानलेले आहे. पण १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या ॲन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्त्वज्ञान साररूपाने आले आहे असे म्हणता येईल.
त्यांनी उपनिषदे व प्रिन्सिपल उपनिषद्स , ब्रह्मसूत्रे ब्रह्मसूत्राज व भगवद्गीता (द भगवद्गीता – १९४८) या वेदान्ताच्या प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथांची निर्मिती केली या व्यक्तिरीक्त द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर ,द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ ,ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन, ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट , द धम्मपद , द रिकव्हरी ऑफ फेथ, ही ग्रंथरचना केली हे एवढ पाहता श्री राधाकृष्णन यांना प्राचीन अर्थाने ‘आचार्य’ ही उपाधी शोभेल. सध्याचे स. प. महाविद्यालय पण जुन्या काळतील न्यु पुना कॉलेज येथे भारतीय व पाश्चिमात्य तसेच ज्ञानेश्वरीचे संपादक श्री सोनोपंतांनी तत्त्वज्ञान मंडळाची स्थापना केली होती (१९२१) त्या मंडळात व्याख्यान देण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् आले होते. राजकारणात असूनही त्यांनी त्यांची ग्रंथनिष्ठा जोपासली व सांभाळली व आपल्या लेखणाने व वाणीने भारतीय संस्कृतीची बीजे पेरली. अशा या थोर तत्वचिंतकास ही अक्षरांजली वाहुन लेखणीस विराम देतो.
छायाचित्र: तत्कालीन शृंगेरी मठाचे शंकराचार्य विद्यातीर्थ स्वामी हे दिल्ली येथे विजय यात्रेच्या दरम्यान आले असता डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांची भेट घेतली.