प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस ही नवीन काही करून दाखवण्याची संधी असते. परंतु मनुष्य स्वभावच असा असतो, की काही प्रयत्नात तो हताश होतो. निसर्गाकडे, पशु पक्ष्याकडे पाहिले तर लक्षात येईल, काहीही झाले तरी त्यांचे प्रयत्न थांबत नाहीत. थांबतो तो केवळ माणूस!
अलीकडे तरुण मुलं मुली नैराश्याने आयुष्य थांबवतात, त्यांना कोणी सांगायला हवं, हे तुझं थांबण्याचं वय नाही, जेव्हा शरीर साथ देणार नाही, तेव्हा सक्तीने थांबावेच लागणार आहे. तेव्हा निवृत्ती घ्यावीच लागणार आहे. मग जोवर तन, मन कार्यरत आहे, तोवर थांबायचे का आणि कोणासाठी? जो थांबला तो संपला!
आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे. घोडा का अडला? भाकरी का करपली? आणि पान का खराब झाले? तर फिरवले नाही म्हणून! सातत्य प्रत्येक गोष्टीत लागते. साधारण वस्तू सुद्धा काही दिवस वापरात नसेल तर ती बंद पडते, बिघडते. मग आपले शरीर तर फार मोठे यंत्र आहे. ते क्रियाशील ठेवण्यासाठी रोज सकाळी स्वतःला सूचना करायची, अपयश आले म्हणून काय झाले? थांबायचे नाही. यश मिळाले तरी इथे थांबायचे नाही. एक प्रयत्न फसला, तर दुसरा प्रयत्न यशस्वी होईल. आपल्याला जीवनात अगणित संधी उपलब्ध आहेत. फक्त आपण त्यांचा वापर कसा करून घेतो यावर सर्व काही अवलंबून आहे. चला तर संधीचे सोने करूया आणि कामाला लागूया.