>> कौस्तुभ कस्तुरे, (इतिहास अभ्यासक व लेखक)
इतिहासात काही माणसांचं जाणं मनाला चटका लावून जातं. अत्यंत बिकट परिस्थितीत मृत्यूला सामोऱ्या गेलेल्या थोरल्या शंभूछत्रपती महाराजांचं उदाहरण आपल्या समोर आहेच. असंच आणखी एक उदाहरण म्हणजे माधवराव पेशव्यांचं.
माधवरावांच्या अंतःसमयाचा पत्रव्यवहार आपल्याकडे पुष्कळ प्रसिद्ध झाला आहे. वासुदेवशास्त्री खरेंनी ऐतिहासिक लेखसंग्रह खंड ४ च्या अखेरीस माधवरावांच्या आजारपणातली आणि मृत्यूसमयीची पत्रं दिली आहेत. ही पत्रं वाचली म्हणजे केवळ ते सगळं नजरेसमोर येऊनच पोटात खड्डा पडतो. जणू काही आपल्यालाच क्षय झाला आहे अशा वेदना ते सगळं वाचताना होतात. काही प्रसंग थोडक्यात देतो..
ऑगस्ट १७७२च्या सुमारास माधवराव चिंतामणीच्या थेऊर मुक्कामी जाऊन राहिले. प्रकृती हळूहळू ढासळत होती. तत्कालीन समजुतीप्रमाणे सगळे उपचार सुरु होते. भूतबाधा वगैरे काढण्याच्या उपायांपासून ते अगदी गंगाविष्णू वैद्यांच्या औषधांपर्यंत सगळं. मध्यंतरी फिरंगी डॉक्टरचं औषधही घेऊन झालं पण काही उपाय नाही. तेरदाळकर रूपेश्वर आणि रणछोड वैद्य सुद्धा होतेच. सप्टेंबर अखेरीसच माधवरावांनी नारायणरावांना राज्य कसं चालवावं यासंबंधी उपदेश केला होता, कारभाऱ्यांनाही समजावलं होतं. भांडणं नकोत म्हणून सखारामबापूंना आपलं कारभारी नेमलं होतं, जेणेकरून त्यांच्या हाताखाली इतर सगळे व्यवस्थित कारभार पाहतील.
हळूहळू माधवराव भ्रमात जाण्याच्या बेतात होते. थेऊरच्या मुक्कामी देखील आपण जणू काही दक्षिणेत हैदरच्या मोहिमेवर आहोत असं वाटून ते मधेच डेरे उभारण्याच्या आज्ञा देत, मध्येच उभारलेले डेरे पाडून भर मध्यरात्री कूच करण्याच्या आज्ञा देत. भ्रमात वैद्य काय सांगतील त्याकडे त्यांचं लक्ष नसे. अमुक एक गोष्ट खाऊ नये म्हटलं की तीच गोष्ट खायचा त्यांना मोह आवरत नसे. रघुनाथरावही अखेरीस थेऊरला येऊन दाखल झाले आणि त्यांनीही अनुष्ठानं सुरु केली.साधारणतः ऑक्टोबरच्या अधेमधे कधीतरी माधवराव चिंतामणीच्या ओवरीत येऊन राहिले. अंतःकाळ समोर दिसू लागला होता. एके दिवशी अचानक दादासाहेब आणि सखारामबापूंना बघून ते म्हणाले, "मला या वेदना आता काही सहन होत नाहीत, मला खंजीर द्या, एकदाचा पोटात खुपसतो आणि या वेदनांपासून मुक्त होतो". दादासाहेबांनी गडबडीने वेळ टाळण्यासाठी म्हटलं, "रविवारपर्यंत वाट पाहू, अगदीच बरं नाही वाटलं तर खंजीर देतो माधवा". दुसऱ्या दिवशी पुन्हा हेच झालं. दादासाहेबांनी खंजीर दिला नाही तेव्हा माधवराव भडकले. तशात ज्वर नसतानाही त्यांच्या अंगाला कापरं भरलं. इच्छारामपंत ढेऱ्यांनी खंजीर हाती दिला नाही म्हणून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना (छड्या) मारण्याची शिक्षा झाली.
मंदिरात दर्शन घ्यायला येणाऱ्यांना दर्शन घेऊन चटकन बाहेर जावे लागत होते. तिथे कोणालाही थांबू दिले जात नव्हते. माधवरावांच्या सर्वांगाला आता सूज यायला सुरुवात झाली होती. हरिपंततात्या फडके आणि नारायणराव त्यांना जेवण भरवत असत. हळूहळू शरीर इतकं जड झालं की त्यांना स्वतःला हालचाल करणंही अवघड झालं. अगदीच इतरांनी हात पाय उचलले तर, पण स्वतःहून हालचाल अशक्य होत होती. एवढं असूनही एका पत्रात म्हटलंय, "इतके दुखणेकरी, हालचाल सर्व बंद, शब्द (फुटत) नसता अजून(ही) लोक (भीतीने) चळाचळा कापतात. मोठा दाब". रमाबाईंनी सतीची वस्त्रं आणायला पुण्याला स्वार पाठवला तेव्हा पुण्यातल्या लोकांना वाटलं माधवराव गेले. ही बातमी इथे माधवरावांना समजली तेव्हा त्यांनी रागाच्या भरात थेट बातमीस्वाराचे हात तोडायची आज्ञा दिली. इतरांनी समजावलं तेव्हा कुठे शांत झाले. त्यातही जवळच्या सावकारांना बोलावून माधवरावांनी कर्जाबद्दल विचारून म्हटलं, "तुमचं कर्ज किती उरलं आहे ते मला सांगा? (जाण्यापूर्वी) ते मी नक्कीच वारीन". सावकार अदबीने म्हणाले, "ही वेळ पैशाविषयी बोलण्याची नाही श्रीमंत, नंतर पाहू"..एका पत्रलेखकाचं वाक्य मोठं अर्थपूर्ण आहे, "भीषण मृत्यू समोर दिसत असता दुःखाचा किंवा निराशेचा उदगार नाही. कृतकृत्यतेच्या आनंदाने वदन खुलून 'आम्ही महायात्रेस जातो, स्वारीची तयारी करा' म्हणून सांगितले". बुधवार, कार्तिक वद्य अष्टमी रोजी पहाटे माधवरावांची प्राणज्योत मालवली. त्याच दिवशी लगेच रमाबाईसाहेब सती गेल्या. थेउरास नदीवर घाट बांधण्यास प्रारंभ करण्यात आला.
माधवराव गेले आणि सगळं संपलं. नंतर उरला तो केवळ सत्तेसाठीचा सावळा गोंधळ. दि. १३ जानेवारी रोजीच्या एका पत्रात म्हटलंय, "श्रीमंत रावसाहेब गेले, याजमुळे सर्वच फसल्यासारखे झाले आहे. वाघ गेला ! सारी कोल्ही राहिली आहेत.. ईश्वरसत्ता प्रमाण"..
माधवरावांच्या कार्याचं मूल्यमापन रियासतकारांनी केलेलं आहेच. अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही "सर्व पेशव्यात थोर कोण?" असा असा प्रश्न पडला असता माधवरावांचं नाव घ्यावं लागलं. माधवरावांनी त्यांच्या वडिलांसारखी, आजोबांसारखी प्रचंड घोडदौड केली नाही. नियतीने ती त्यांना करू दिली नाही. पानिपतचा जबर धक्का, हळूहळू ढासळत गेलेली तब्येत, त्यात घरातली सत्तेसाठीची राजकारणं, सगळे शत्रू उरावर बसलेले, अशा सगळ्या परिस्थितीत माधवरावांना मुळात जे आहे ते सांभाळणं, आणि मग शक्य होईल तितकं वाढवणं हे गरजेचं होतं, आणि ते त्यांनी केलं. पुढच्या काळात जी दोन नररत्न हिंदुस्थानभर गाजली ती माधवरावांच्या कारकिर्दीत पुढे आली, एक होते रणधुरंधर सेनापती महादजी शिंदे आणि दुसरे म्हणजे राजकार्यधुरंधर नाना फडणवीस. माणसं ओळखून त्यांच्याकडून कामं करून घेण्याची हातोटी या पेशव्याकडे होती. माधवराव अखेरपर्यंत जिवंत होते ते केवळ एका ध्येयासाठी असं मला वाटतं, अन ते म्हणजे पानिपतनंतर झालेली मानहानी, वित्तहानी भरून काढून मराठ्यांचा जरीपटका पुन्हा हिंदुस्थानभर दिमाखात डौलावा, दिल्लीच्या पातशाहीतील विषारी नाग नजीब आणि त्याची पिलावळ ठेचली जावी आणि पुन्हा मराठे हेच बलशाली आहेत हे अखंड हिंदुस्थानला समजावं हे ते ध्येय.
"प्रतिशोध" लिहिताना माझ्या डोळ्यांसमोर हा काळ कायम तरळत होता. काय वाटलं असेल या माणसाला जेव्हा उत्तरेतून विसाजी कृष्ण, महादजी आणि तुकोजी होळकरांनी पानिपतचा वचपा काढल्याची पत्रं आली असतील तेव्हा? बिनीवाल्यांचं स्वागत पुण्यात येताना सोन्याची फुलं उधळून करा म्हणताना काय आनंदाने चेहरा फुलला असेल त्यांचा? त्या दिवशी ते दिल्ली दरवाज्यावरच्या नगारखान्यात तासनतास उभं राहून उत्तरेकडे पाहून समाधानाने हसले असतील का? त्यांच्या मनात भाऊसाहेब, दत्ताजीबाबा, जनकोजी, विश्वासराव आणि अशाच अनेक रणझुंझारांची छबी उमटली असेल का? अखेरीस, त्या थेऊरच्या ओवरीत अखेरचा श्वास घेताना आपल्या वडिलांचा, नानांचा हात मायेने आपल्या मस्तकी फिरून, "माधवा, तू सगळे पांग फेडलेस, पानिपतचा प्रतिशोध घेतलास, आता शांत चित्ताने मजजवळ ये लेकरा" असं जाणवून त्या पुण्यात्म्याने डोळे मिटले असतील का? कागदपत्रांच्या साहाय्याने कदाचित हे सगळे प्रश्न कधीच उकलणार नाहीत. त्यासाठी उपलब्ध पत्रव्यवहाराच्या आधारे कल्पनाच करावी लागेल. पण आहे हे असं आहे..
आज दि. ५ डिसेंबर, ज्युलियन तारखेनुसार माधवरावांचा स्मरणदिन. शतायुषी असल्यागत कामाचा उरक करणाऱ्या या अल्पायुषी पंतप्रधानाला ही केवळ लहानशी शब्दांजली..
चित्र संकल्पना: माधवराव मृत्यूनंतर स्वर्गात चिंतामणीच्या समोर उभे आहेत..