'जागू में सारी रैना बलमा' ही प्रभा ताईंनी गायलेली बंदिश तुम्ही ऐकलीय? शास्त्रीय संगीताची आवड नसली, तरीही एकदा ती जरूर ऐका. अवघ्या पाच मिनिटांत अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे मूर्त स्वरूप दिसेल. तपश्चर्या कशाला म्हणतात हे त्यांच्या गायकीतून कळेल. त्यांचा यमन, मारुबिहाग, कलावतीही तेवढाच प्रिय, अवीट गोडी देणारा!
फार कमी लोक असतात, ज्यांना आपल्या आयुष्यात कोssहम? अर्थात मी कोण, कशासाठी जन्माला आलोय आणि मला काय करायचे आहे, याची कमी वयात जाणीव होते. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यादेखील अशाच दिग्गजांपैकी एक! वयाच्या आठव्या वर्षी त्यांना आईकडून गाण्याचा वारसा मिळाला. पं. सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्याकडून किराणा घराण्याची तालीम मिळाली आणि तेव्हापासून त्या अविरतपणे आपली गायनसेवा देत आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे प्रभाताईंना मिळालेले सन्मान, हा तर त्या पुरस्कारांचा गौरव! आयुष्यभर विपुल गायन, लेखन, प्रबोधन, प्रशिक्षण देऊन या गानतपस्विनीने आज जगाचा निरोप घेतला.
शास्त्रीय संगीत क्षेत्राला एकामागोमाग एक हादरे बसत आहेत. ग्वाल्हेर घराण्याच्या रियाजसिद्ध गायिका मालिनी ताई राजूरकर, पखवाज तालश्री पंडित भवानी शंकर,रामपूर सहस्वान घराण्याची पताका त्रिखंडात गाजविणारे उस्ताद रशीद खान आणि आज किराणा घराण्याच्या स्वयंभू प्रतिभासंपन्न संगीत साधिका गान गुरू डॉक्टर प्रभाताई अत्रे ..भारतीय संगीताला वेढून राहिलेली स्वरसरस्वती लुप्त झाली.शास्त्रीय संगीताकडे पाहण्या ऐकण्याची दृष्टी केवळ त्यांच्याशी साधलेल्या संवादातून,सहवासातून माझ्या सारख्या अनेकांना मिळाली. संवेदनशील कवयित्री, लेखिका, जगभर भारतीय संगीताच्या श्रवण मनन निदिध्यासाचे मार्गदर्शन करणाऱ्या अलौकिक प्रतिभेच्या ज्येष्ठ गायिका प्रभा ताई, तुम्हाला अखेरचा दंडवत.
त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळावी हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे.