किन्त्सुंगी ही एक जपानी शिल्पकला आहे. या कलेचा वापर करून तुटलेली भांडी जोडली जातात. तुटलेल्या भागांना एकत्र सांधून नवी आकर्षक रचना करतात. पण त्याचा आणि संकटांचा परस्पर संबंध काय ते पाहू.
जेव्हा एखादी वस्तू फुटते तेव्हा वस्तू फुटण्यापेक्षा जास्त मोठा आवाज आईचा येतो आणि जेव्हा वस्तू फुटण्याचा आवाज येऊनही आईचा ओरडा ऐकू येत नाही तेव्हा ती वस्तू आईच्याच हातून फुटली असे समजावे' अशा आशयाची ग्राफिटी वाचली होती. जी बहुतांश खरीदेखील आहे. परंतु ही झाली आपली मानसिकता. याच प्रसंगाकडे जपानी लोक वेगळ्या दृष्टीने पाहतात.
जपानमध्ये एखादी वस्तू फुटली की किन्त्सुंगी कलाकारी करणाऱ्या कारागिरांकडे ती नेतात आणि परत जोडून घेतात व शोभेच्या वस्तूप्रमाणे जपून ठेवतात. असे करण्यामागे ते कारण सांगतात की एखादी वस्तू हातून चुकून फुटली म्हणजे घरावर येणारे मोठे संकट परस्पर दूर झाले आणि ते संकट त्या वस्तूने पेलून धरले. त्या वस्तू प्रति कृतज्ञता म्हणून ती वस्तू जपून ठेवली जाते.
एवढेच काय तर एका जपानी कथेनुसार एका व्यक्तीने बराच काळ पैसे जमवून कार खरेदी केली आणि एक दिवस तो सहकुटुंब त्या कारने प्रवास करायला निघाला. मात्र वाटेतच एक भले मोठे झाड उन्मळून त्या कारवर पडले. त्यामुळे कार पूर्ण चेपली गेली. मात्र सुदैवाने सगळं कुटुंब वाचलं. पहिल्याच प्रवासात असा अनुभव आल्याने घरच्यांनी ती कार विकून टाकायला सांगितली. परंतु त्या जपानी माणसाने मोठ्या कष्टाने विकत घेतलेली कार डागडुजी करून घेतली आणि परत वापरायला सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या घरच्यांनी त्याला तसे करण्यामागचे कारण विचारले तर त्या व्यक्तीने सांगितले, ज्या गाडीने आपले संरक्षण केले ती मी विकणार नाही तर आणखीनच सांभाळून वापरणार.
या कथेवरून आणि एकूणच जपानी मानसिकतेवरून त्यांची सकारात्मकता दिसून येते. म्हणूनच ते लोक एवढ्यांना अस्मानी, सुलतानी संकटाना सामोरे जाऊनही पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहण्याची जिद्द दाखवतात.
किन्त्सुंगी या कलेचे सार आपल्याला आयुष्याची हीच शिकवण देते, की कितीही वेळा मोडून पडलात तरी पुन्हा उभे राहण्याचे आणि पूर्वी पेक्षा अधिक आकर्षक बनण्याचा सदैव प्रयत्न करा!