सनातन धर्माच्या अनेक पुस्तकांमध्ये ८४ लक्ष योनींचा उल्लेख आहे. असे म्हणतात की ८४ लाख जन्मांचा टप्पा ओलांडल्यानंतर सत्कर्माच्या जोरावर मनुष्य देह मिळतो आणि आत्मा मनुष्य रूपात जन्माला येतो. पण या ८४ लाख योनी नेमक्या कशा आहेत? याबद्दल पद्मपुराणात तपशीलवार दिलेले वर्णन जाणून घेऊया.
८४ लक्ष योनीचे चक्र समजून घेऊ
पद्म पुराणानुसार, ८४ लाख योनीचा अर्थ ब्रह्मांडात आढळणारे विविध प्रकारचे प्राणी आहेत. या सजीवांना योजिन आणि सन्यावती या दोन भागात विभागले आहे. यासोबतच प्राण्यांचे शरीर थलचर, नभचर आणि जलचर असे ३ भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. पुराणात ९ लाख जलचर, २० लाख झाडे-वनस्पती, ११ लाख कीटक, १० लाख पक्षी, ३० लाख प्राणी आणि ४ लाख देवता, दानव आणि मानव असल्याचे सांगितले आहे. या सर्व मिळून एकूण ८४ लाख योनी तयार होतात.
मानवी योनी शेवटी असते
नरदेहाला अर्थात मनुष्य देहाला मुक्तीचे दार म्हटले आहे. कारण मानवी देहात ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मेंदू आणि विचार करण्यासाठी मन दिले आहे. त्यामुळे बरे वाईट यातला भेद ओळखून पुण्य कर्म करावे आणि या चक्रातून मुक्ती मिळवावी अशी ईश्वरी रचना आहे. तसे झाले नाही तर आत्म्याचा प्रवास पुन्हा सुरु होतो. सुख दुःखाचे सोहळे, पीडा, भय या सगळ्या गोष्टी ८४ लाख देहाच्या प्रवासात पुन्हा सहन कराव्या लागतात. म्हणून हा देह सत्कारणी लावा असे संत कानीकपाळी ओरडून सांगतात. याच गोष्टीला पद्म पुराणाने दुजोरा दिला आहे.
पद्मपुराणात वर्णन केले आहे
पद्मपुराणात असे म्हटले आहे की जेव्हा आत्मा विहित ८४ लाख योनीचा प्रवास पूर्ण करतो आणि त्याचे कर्म देखील चांगले असते तेव्हा त्याला पितृ किंवा देव योनी प्राप्त होतो. अर्थात ती व्यक्ती मृत्यूनंतर वैकुंठधामला जाते. दुष्ट कर्म करणारा आत्मा पुन्हा ८४ लाख जन्मांत जन्म घेण्यासाठी पाठवला जातो. वेद आणि पुराणांमध्ये याला दुर्गती म्हटले आहे, म्हणजे आत्मा पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो, ही परिस्थिती आदर्श मानली जात नाही.
त्यामुळे स्वर्गात जायचे की नरकात हे आपले भाग्य नाही तर आपले कर्म ठरवते हे लक्षात ठेवा आणि नेहमी प्रामाणिकपणे आपले काम करत राहा. कारण आपल्या प्रत्येक कामाची नोंद घेतली जाते. ते नीट केले नाही तर पुन्हा आपल्या आत्म्याला ८४ लक्ष योनीचा प्रवास करावा लागणार हे निश्चित!