गंगा नदी हिंदु धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. तिला माता म्हणून संबोधले जाते. गंगेत स्नान केल्याने पापक्षालन होते, अशीही श्रद्धा आहे. गंगेच्या पाण्याला तीर्थ समजून प्राशन केले जाते. एवढेच नाही, तर एखादी व्यक्ती निधन पावली असता किंवा मरणासन्न अवस्थेत पोहोचली असता तिच्या मुखात गंगाजल घातले जाते. गंगाजलाला देवघरातील पूजेतही मनाचे स्थान असते. त्यामुळे घराघरात गंगाजल असतेच. फक्त ते कोणत्या स्थितीत आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. जाणून घेऊया त्यामागील यथोचित शास्त्र!
देवघरात गंगाजल ठेवताना पुढील काळजी घ्या -
>>घरात गंगाजल ठेवल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता पसरते. यासाठी गंगाजल नेहमी स्वच्छ जागी ठेवा. त्याच्या आजूबाजूला कोणतीही अस्वच्छ वस्तू ठेवू नका. म्हणून देवघरात गंगाजल ठेवणे आणि त्याची नियमित स्वच्छता करणे चांगले.
>>गंगाजल अत्यंत पवित्र असून ते शुद्ध धातूपासून बनवलेल्या भांड्यात ठेवावे. तांबे किंवा चांदीचे भांडे यासाठी सर्वोत्तम आहेत. प्लॅस्टिकच्या बाटलीत गंगाजल ठेवणे योग्य नाही. त्यामुळे पाण्यातील औषधी गुणधर्म निकामी होतात.
>>गंगाजल आपण पवित्र मानतो. त्यामुळे त्याचे पावित्र्य जपणे हे आपले आद्यकर्तव्य समजा. तसेच घरातील गंगाजल बंद धातूच्या पात्रात ठेवा आणि ते पात्र वेळोवेळी बाहेरून स्वच्छ करा.
>>पूजेत किंवा मंगलकार्यात गंगाजल वापरताना गंगा मातेचे मनोभावे स्मरण करा त्यामुळे ते पाणी तीर्थ बनून त्यात प्रसादत्व उतरेल.
>>देवघरात गंगाजल ठेवताना ईशान्य बाजूला ठेवा. पवित्र नद्यांचे पाणी नेहमी ईशान्य दिशेला ठेवावे.
>>गंगाजल कधीही अंधारात ठेवू नका. रात्रीही तिथे मंद प्रकाश ठेवा. तसेच गंगाजलला बंद कपाटात ठेवू नका.
>>आठवड्यातून एकदा आंघोळ झाल्यावर किंवा मंगल कार्याच्या प्रसंगी संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते.