शिवमंदिर हे नेहमीच अन्य मंदिरांच्या तुलनेत थोडे गूढ स्थान वाटते. तेथील वातावरण मनावर वेगळाच परिणाम निर्माण करते. देशभरात अशी अनेक शिव मंदिरे आहेत जी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कुठे शिव खंडित त्रिशूलची पूजा केली जाते, तर कुठे पाण्याखाली असलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते. पण असे एक शिव मंदिर आहे जिथे शिव लिंगाची पूजाच केली जात नाही.
भोलेनाथ शिवशंकर यांना महादेव म्हटले जाते. केवळ मानवच नव्हे तर देवताही त्यांची उपासना करतात. शिवलिंगावर अभिषेक करतात. जप, तप, साधना करतात. आपल्या देशात असे एक शिव मंदिर आहे जे पाहण्यासाठी लोक दूरदूरून येतात, पण इथे भगवान शिवाची पूजा केली जात नाही. उलट असे म्हटले जाते, की तिथे उपासना करणारी व्यक्ती रसातळाला जाते. असे असले तरी हे शिव मंदिर कुठे आहे आणि या मंदिरामागील कथा काय आहे, ते पाहूया.
पिथौरागडमध्ये हथिया देवळ मंदिर आहे
उत्तराखंडमधील पिथौरागड येथे सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बल्तिर या गावात एक हाथिया देवळ नावाचे मंदिर आहे. हे शिव मंदिर देवभूमी म्हणून ओळखले जाते. या मंदिरात शिवलिंग आहे, भोलेनाथांची येथे स्थापना झाली आहे पण मंदिरात त्यांची पूजा केली जात नाही. यामागचे कारण असे आहे की या मंदिराला शाप आहे की तिथे जर कोणी येथे पूजा केली तर त्याला बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो आणि तो उध्वस्त होतो. म्हणूनच येथे येणारे शिवभक्त भोलेनाथांना नवस मागतात पण फुले किंवा पाणी देऊन त्यांची पूजा करत नाहीत.
त्यामागे कथा अशी सांगितली जाते, की एक शिल्पकार आपल्या कलेत अतिशय पारंगत होता. एका अपघातात त्याचा एक हात तुटला. तरीदेखील दुसऱ्या हाताने त्याने आपली कारागिरी सुरु ठेवली होती. परंतु त्याच्या कलेची कोणीच दखल घेत नव्हते. त्याने रातोरात काहीतरी अचाट करून दाखवायचे ठरवले. गावाच्या वेशीवर असलेला मोठा डोंगर त्याने निवडला आणि त्या डोंगराला शिवालय बनवण्याचा निर्धार केला. त्याने ते अचाट कृत्य एका रात्रीत केलेसुद्धा! दुसऱ्या दिवशी समस्त गावकरी जमले. सर्वांना कुतुहल वाटू लागले. ते शिल्पकाराचे कौतुक करणार, पण शिल्पकार गायब होता. त्यांनी बराच काळ त्याचा शोध घेतला. ते शिवालय अंतर्बाह्य पाहिले, तेव्हा तिथल्या पंडितांनी सांगितले, की शिल्पकाराने घाई गडबडीत मोठी चूक केली, ती म्हणजे शिवलिंगाची बाजू चुकीच्या दिशेने कोरली. त्यामुळे अशा शिवलिंगाची पूजा करणे चुकीचे ठरेल. परंतु वास्तुकलेच्या आणि स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीने, ती वास्तू एवढी सुंदर उभारली होती, की ती भग्न न करता केवळ शिवलिंगाचे दर्शन घ्यायचे परंतु उपासना करायची नाही, असे ठरले आणि भविष्यात तो अलिखित नियमच बनला.