परमेश्वराचे खरे स्वरूप पूर्ण प्रकाशमय व निर्गुण, निराकार आहे. निर्गुण, निराकाराचे स्मरण करणे अवघड वाटते. नजरेसमोर कोणती तरी चांगली मूर्ती पाहिल्याशिवाय मनात चांगले विचार येत नाही. परमेश्वराचे सगुण व साकार रूप पाहिल्यावर सामान्य माणसाच्या मनात चांगली भावना निर्माण होईल, मन एकाग्र करता येईल, जप तप साधना करणे सोयीचे होईल असा चांगला हेतू ठेवून मूर्ती निर्माण केल्या गेल्या.
प्राचीन काळी मूर्तीपूजा नव्हती. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी तांदुळाच्या सहाय्याने श्रीयंत्र काढीत. देव देवतांना विशिष्ट मंत्राने आवाहन करीत. त्यांची पूजा अर्चा करीत. पुढे पुढे ते श्रीयंत्रानंतर शाळीग्रामाची पूजा अर्चा करू लागले. कौरव पांडवांच्या महायुद्ध समाप्तीनंतर भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राचा त्याग केला. गंडकी नदीत त्यांनी सुदर्शन चक्र सोडल्यावर पाण्याचा प्रवास उलट फिरला. तेव्हा सुदर्शन चक्र काही दगडावर आपटत गेले. काही दगडावर चक्राच्या अरीच्या खुणा उमटल्या. अशा खुणा उमटलेल्या शाळीग्रामाला विशेष महत्त्व आहे.
शाळीग्रामाऐवजी मूर्तीपूजा करण्याची प्रथा आद्य श्रीशंकराचार्यांनी सुरू केली. विविध देवदेवतांचे महत्त्व लक्षात घेऊन पंचायतन पूजा सुरू केली. श्रीकृष्ण, शंकर, दत्तात्रेय, श्रीराम इ. देवदेवतांना मंत्रोच्चाराने आवहन केले जात असे. ऋषी मुनींच्या मंत्रोच्चाराने मूर्ती साकार होत असे. त्याची वर्णने पुराणात होऊ लागली. हळू हळू पुराणात असलेल्या वर्णनानुसार मूर्ती स्थापन होऊ लागल्या.
देवदेवतांच्या मूर्ती स्थापन करण्यामागे पुष्कळ चांगले हेतू आहेत. मूर्ती पाहिल्यानंतर सामान्य माणसाच्या मनात चांगली भावना निर्माण होते. मन एकाग्र होते. मन एकाग्र झाले की जप तप साधना करणे सोयीस्कर होऊन परमार्थामध्ये चांगली प्रगती साधता येते.
समाजातील काही लोकांनी याचा योग्य अर्थ लक्षात न घेता श्रीयंत्र श्रेष्ठ की मूर्ती श्रेष्ठ हा वाद सुरू केला. वास्तविक पाहता दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त स्वरूप वेगळे आहे. व्यवस्थित मंत्रोच्चाराने श्रीयंत्रामध्ये जितकी शक्ती व चैतन्य निर्माण होऊ शकेल, तेवढीच मूर्तीतही होऊ शकते. मूर्तीला हवा तसा आकार देता येतो, परंतु श्रीयंत्राला देता येत नाही.
मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होण्यासाठी `यथादेहे तथा देवे' अशी भावना आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे. मला जे जे पाहिजे ते ते सर्व देवाला दिले पाहिजे. मूर्तीची पूजा करताना ती मूर्ती सजीव व्यक्ती आहे समजून सगळे सोपस्कार करावेत. जर आपण कोमट पाण्याने स्नान करत असू, तर देवालाही कोमट पाण्याने स्नान घालायला हवे. नित्यनेमाने देवाची पूजा, आरती करून नैवेद्य दाखवावा. रोज एकाग्र मनाने, पूर्ण श्रद्धेने, संपूर्ण तन्मयतेने पूजा केल्यास त्या मूर्तीमध्ये चैतन्य उत्पन्न होते.
देवाच्या मूर्तीमध्ये कोणत्या प्रकारचे व किती प्रमाणात चैतन्य निर्माण झाले आहे, हे मूर्तीचे दर्शन घेतल्यावर जाणवते. सात्विक व्यक्तींना त्याप्रमाणे संवेदना होऊ लागतात. मूर्तीतून निघणारी किरणे जाणवतात. जितक्या प्रमाणात संवेदना निर्माण होतील, त्याप्रमाणात त्या जागेचे पावित्र्य व मांगल्य किती हे लक्षात येते. मूर्तीची जितकी मन लावून सेवा करावी, तेवढी आपल्या मनाची प्रसन्नता वाढते असा अनुभव आहे.