एक आम्रवृक्ष मोठ्या डौलात उभा होता. त्याच्यासभोवती गवत उगवले होते. वाऱ्याची एक लहानशी झुळूक येताच गवताचे पाते हलले, त्याबरोबर आम्रवृक्षाला हसू फुटले. ते छद्मीपणाचे हसू होते. त्यात अहंकार डोकावत होता. आपल्याला कोण हसले म्हणून गवताने मान उंचावून पाहिले.
आम्रवृक्ष त्याला म्हणाला, `किती नाजूक रे तू! मी मात्र लहानपणापासून कणखर. वाकणं, घाबरणं मला ठाऊक नाही!'त्यावर गवताचे पाते हळू आवाजात म्हणाले, `भीती वाटत नाही हे ठीक आहे रे, परंतु विश्वातील सर्वोच्य शक्तीपुढे प्रत्येकाने नम्र असायला हवे. नम्रता हा सद्गुण आहे.'यावर तो आम्रवृक्ष खदखदा हसू लागला आणि म्हणाला, `कसला देव आणि कसले काय? काऽऽऽही खरं नसतं बघ! सगळं काही मीच! आता हेच बघ ना. माझी इच्छा नव्हती, मी नाही हललो, नाहीतर तू! पण आता मी माझ्या इच्छेने हलून दाखवतो बघ!'
असे म्हणत तो महाकाय आम्रवृक्ष गदागदा हलू लागला. गवताच्या पात्याच्या लक्षात आले, की अचानक जोरात वारा वाहू लागल्यामुळे आम्रवृक्ष हलू लागला आहे. परंतु याचे श्रेय वाऱ्याला न देता, आम्रवृक्षाला लाटायचे होते. कारण तो त्याच्या अहंकारात मस्त होता. एकाएक वाऱ्याचे पर्यवसान वादळात झाले आणि पाहता पाहता तो आम्रवृक्ष मूळासकट उन्मळून पडला. परंतु त्याचवेळेस परमेश्वरावर विसंबून असलेले गवताचे नाजूक पाते नम्रतेने परंतु तग धरून उभे होते. या प्रसंगाचे वर्णन करताना संत शिरोमणी तुकोबाराय लिहीतात-
महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती!
अहंकारी माणसाचा टिकाव कधीच लागू शकत नाही, जो नम्र असतो तोच शेवपर्यंत टिकून राहतो, हेच या गोष्टीचे तात्पर्य!