Numerology: भारतीय प्राचीन परंपरेत ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. केवळ जन्मकुंडली नाही, तर हस्तरेषा, स्वप्नशास्त्र, अंकशास्त्र, समुद्रशास्त्र यातूनही भविष्यकथन करता येते. अंकशास्त्रात जन्मतारखेवर आधारित मूलांकावरून व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्य, भविष्यकथन केले जाते. जसा प्रत्येक राशीचा स्वामी असतो, तसेच प्रत्येक मूलांकालाही ग्रहांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मूलांक काढला जातो. १ ते ९ या अंकांचे वर्णन अंकशास्त्रात उपलब्ध आहे.
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५ आणि २४ या तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. आताच्या घडीला शुक्र मेष राशीतून स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत विराजमान झाला आहे. शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला जातो. या मूलांकाच्या व्यक्ती हाती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात. तसेच या मूलाकांच्या व्यक्तीवर शुक्रासह लक्ष्मी देवीची कृपा असल्याचे सांगितले जाते.
पैसे कमवण्याची जबरदस्त हौस
मूलांक ६ असलेल्या व्यक्ती आकर्षक असतात. या व्यक्ती कला आणि मनोरंजन प्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात. या लोकांना पैसे कमवण्याची जबरदस्त हौस असते. त्यासाठी ते कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातही मेहनत घेतात. या लोकांना मनी माइंडेड असेही म्हणतात.
महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो
मूलांक ६ असलेल्या व्यक्ती शिक्षणातही चांगल्या असतात. ते त्यांच्या मेहनतीने जीवनात भरपूर पैसाही कमावतात. मात्र आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात. त्यांना पैसे खर्च करण्याचीही आवड आहे. तसेच, या लोकांना महागड्या वस्तू घेण्याचा शौक असतो. त्यांना वैभवशाली जीवन जगायला आवडते. या लोकांची कामे शुक्राच्या प्रभावाखाली होत असतात.
कोणत्या क्षेत्रात मिळते अपार यश?
मूलांक ६ असलेल्या व्यक्ती मीडिया, फॅशन डिझायनिंग किंवा अभिनयाचा कोर्स केला तर त्यांना चांगले यश मिळू शकते. यासोबतच कपडे, चैनीच्या वस्तू, सोने, चांदी आणि हिरे यांच्याशी संबंधित व्यापार, उद्योग, व्यवसाय खूप प्रगती देऊ शकतो. फिक्कट निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग या मूलांकांच्या व्यक्तींसाठी सर्वांत शुभ मानला जातो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"