आषाढी एकादशीपासून सुरू झालेल्या चातुर्मासातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गुरूला देवा इतकेच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला जातो. यंदा गुरुपौर्णिमा १३ जुलैला आहे. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. गुरूपौर्णिमेला गुरूपूजनही केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. यंदाच्या गुरुपौर्णिमेला एक नाही, दोन नाही, तर तब्बल ९ शुभ योगांचा महासंयोग जुळून आल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया... (guru purnima 2022)
गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा केली जाते, असे नाही तर त्याचे अनेक फायदेही आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार जो व्यक्ती आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना करतो आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो, त्याला गुरु ग्रहाचे शुभ फल प्राप्त होते. ज्यांच्या कुंडलीत गुरूची स्थिती अनुकूल नाही त्यांनाही गुरुपूजेचा लाभ होतो, असे सांगितले जाते. गुरुपौर्णिमेला अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहेत. या शुभ योगांमुळे गुरुपौर्णिमेला अनेक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात ज्ञान, संपत्ती, सुख आणि ऐश्वर्य यांचे योग पाहायला मिळतील. या शुभ योगात गुरुची उपासना केल्याने जीवनातील संकटातून बाहेर पडण्यातही यश मिळेल.
गुरुपौर्णिमेला पंचमहापुरुष योग
ज्योतिषशास्त्रानुसार, अत्यंत शुभ आणि फलदायी पंचमहापुरुष योग गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर जुळून येणार आहे. जेव्हा मंगळ विशिष्ट दिवशी स्वतःच्या राशीत असतो तेव्हा रुचक नावाचा शुभ योग तयार होतो, जेव्हा बुध स्वतःच्या राशीत असतो तेव्हा भद्रा योग असतो, जेव्हा शुक्र स्वतःच्या राशीत असतो तेव्हा मालव्य योग असतो. गुरु आपल्या राशीत आहे. हंस योगात असेल, आणि शनि स्वतःच्या राशीत असेल तर शशयोग तयार होतो. जेव्हा हे पाच शुभ योग एका दिवशी एकत्र होतात तेव्हा त्याला पंचमहापुरुष योग म्हणतात. या योगामुळे १३ जुलै रोजी सकाळी १०.५० वाजेपर्यंत ज्यांचा जन्म होईल त्यांच्या कुंडलीतही हा उत्तम योग असेल. या योगामध्ये गुरूची पूजा, व्यास मुनींची पूजा आणि लक्ष्मी नारायण यांची पूजा करणे अत्यंत शुभ राहील, असे सांगितले जात आहे.
बुधादित्य आणि लक्ष्मी-नारायण योग
गुरुपौर्णिमेला शुक्र संक्रांत आहे, या दिवशी शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल. मिथुन राशीत शुक्राच्या आगमनाने अतिशय शुभ फलदायी लक्ष्मी नारायण योग तयार होईल. कोणतेही नवीन काम करणे आणि व्यवसाय सुरू करणे या योगात खूप शुभ राहील. ज्यांना गुरु मंत्र घ्यायचा आहे किंवा मुलांचे शिक्षण सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी हा योग अतिशय शुभ राहील. तसेच मिथुन राशीत बुध आणि सूर्य ग्रह विराजमान आहेत. या दोन्ही ग्रहांच्या योगामुळे अत्यंत शुभ मानला गेलेला बुधादित्य योगही जुळून येत आहे.
गजकेसरी आणि रवियोगात गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व शुभ योगांसोबत गुरु ग्रह आणखी एक शुभ योग बनवत आहे, जो गजकेसरी योग म्हणून ओळखला जातो. या शुभ योगात गुरुसोबत चंद्राचाही हातभार लागेल कारण गुरु आणि चंद्र मिळून हा योग तयार होतो. या दिवशी चंद्र आणि गुरु एकमेकांपासून केंद्रस्थानी असतील, त्यामुळे गजकेसरी योगही गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरूची उपासना करणाऱ्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतील. या शुभ योगांसोबतच सर्व दोष दूर करणारा रवियोगही गुरुपौर्णिमेला उपस्थित राहणार आहे.