नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मेष राशीत विराजमान झाला आहे. सूर्य संपूर्ण वर्षभरात एक राशीचक्र पूर्ण करतो. एका राशीत सुमारे एक महिना सूर्य विराजमान राहतो. सूर्याचे राशी संक्रमण ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. यश, प्रगती, मान-सन्मान, नेतृत्व, प्रतिष्ठा यांचा कारक म्हणून सूर्याकडे पाहिले जाते. सूर्याचे कुंडलीतील स्थान महत्त्वाचे मानले गेले आहे.
सूर्याचा राशीबदल काही राशीच्या व्यक्तींना शुभ ठरतो, तर काही राशीच्या व्यक्तींना तो प्रतिकूल फलकारक ठरू शकतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असेल, त्याला करिअर, कार्यक्षेत्रात चांगले यश, प्रगती साध्य करता येऊ शकते. मात्र, ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य मजबूत नसेल, त्यांना आरोग्यासह अनेकविध समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशावेळी सूर्यदेवाचे काही उपाय उपयुक्त ठरू शकतात, अशी ज्योतिषीय मान्यता आहे. नेमके कोणते उपाय करू शकतो, जाणून घेऊया...
सूर्याची कुंडलीतील स्थिती मजबूत करावयाचे काही उपाय
- एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य अनुकूल नसेल, तर त्या व्यक्तीला १२ रविवार सूर्याचे व्रत करण्याचा सल्ला दिला जातो. सूर्याच्या उपासनेसाठी रविवार शुभ मानला गेला आहे. असे केल्याने यश, प्रगती प्राप्त करता येऊ शकते, असे म्हटले जाते.
- ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याचे कुंडलीतील स्थान मजबूत करावयाचे असेल, तर सकाळी लवकर उठून सूर्योदयला सूर्य देवतेला अर्घ द्यावे. एका स्वच्छ भांड्यात रक्तचंदन, लाल फूल, अक्षता आणि दुर्वा घेऊन सूर्याला अर्पण कराव्यात.
- तसेच ॐ ह्रां ह्रीं ह्रौं स: सूर्याय नम: या सूर्याचा मंत्राचा ३, ५ किंवा १२ माळा जप करावा. इतका जप शक्य नसेल, तर यथाशक्ती करावा. रविवारी स्नानादी कार्य उरकल्यानंतर लाल रंगाचा समावेश असलेले कपडे घालावेत, असा सल्ला दिला जातो.
- सूर्याची कुंडलीतील स्थिती मजबूत करण्यासाठी लाल, पिवळे वस्त्र, गुळ, तांब्याच्या वस्तू, गहू, कमळ, मसूर डाळ यांचे दान द्यावे. असे केल्याने शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जाते.
- याशिवाय सूर्याचे रत्न माणिक धारण करावे. मात्र, त्याची योग्य पद्धत, धारण करण्याचा विधी, यासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अवश्य घ्यावा.
- सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. पठण शक्य नसल्यास एकचित्ताने श्रवण करावे. तसेच गायत्री मंत्राचे पठण लाभदायक ठरू शकते.
- रविवारी शक्यतो मीठाचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. या दिवशी आपल्या आहारात भगर, दूध, दही, साखर यांचे सेवन करावे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- सदर माहिती ज्योतिषीय मान्यता आणि सामान्य गृहीतकांवर आधारित आहेत. आपल्या कुंडलीतील सूर्याचे स्थान, त्याचे लाभ किंवा परिणाम आणि त्यावरील उपाय यांसाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा, असे सांगितले जात आहे.