शनि हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. पौराणिक कथा आणि धर्मग्रंथांमध्ये शनिला सूर्यपुत्र आणि कर्माचा दाता म्हटले गेले आहे. कलियुगात केवळ शनिच मानवाच्या कर्माचा लेखाजोखा करतो. यामुळेच लोक शनिदेवाला घाबरतात. पण असे नाही की शनिदेव नेहमीच वाईट फळ देतात. तो शिस्त लावण्यासाठी परीक्षा घेतो. मात्र काही राशींवर त्याची कायम वक्र दृष्टी असते, ती केवळ त्यांच्या विकासासाठी आणि उत्कर्षासाठी. म्हणून घाबरून न जाता शनी महाराजांच्या प्रकोपासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करता येतील ते पाहू. विशेषतः पुढील तीन राशींनी याबाबत खबरदारी घ्या.
मेष : शनीचे मंगळाशी वैर आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी मानला जातो. शनी आणि मंगळाचे परस्पर नाते चांगले नसल्यामुळे मेष राशीवर शनीचा प्रभाव पडल्यास किंवा साडे साती असतानाच्या काळात अनेक कामांत अडचणी वाढतात. कामे पूर्ण होण्यात विलंब होतो. धनहानी होते आणि प्रगतीत अडथळे येतात. म्हणून मेष राशीने गणेश उपासने बरोबर हनुमंताची किंवा शनीची उपासना करावी. शनिवारी शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे, दानधर्म करावा आणि आपल्या रागावर नियंत्रण ठेवून कोणाचा अपमान आपल्याकडून होणार नाही ना, याबद्दल दक्षता घ्यावी.
कर्क : ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांना शनि त्यांच्या विशिष्ट अवस्थेत त्रास देतो. चंद्राला या राशीचा स्वामी म्हटले जाते. शनिदेवाचे चंद्राशी वैर आहे. यामुळेच जेव्हा कुंडलीत शनि आणि चंद्र एकत्र येतात तेव्हा विष योग तयार होतो. ज्या कुंडलीमध्ये हा योग तयार होतो, त्या राशीमध्ये मानसिक त्रास आणि अज्ञात भीतीची समस्या कायम राहते. यामुळे व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि त्याचे नुकसान होते. अशा वेळी कर्क राशीने सतर्क राहून शनी उपासनेला प्राधान्य द्यावे. आपल्या उपास्य देवतेच्या जपाबरोबर शनी महाराजांचा जप करावा. अडचणीच्या काळात कोणाशी वाईट बोलून वैर घेऊ नये.
सिंह : ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे असे म्हणतात. शनी हा सूर्यपुत्र असूनही या पिता पुत्रांमध्ये जन्मतः वैर भाव आहे. दोघेही एकमेकांचे शत्रू मानले जातात. या कारणांमुळे शनिदेव सिंह राशीच्या लोकांना साडेसती आणि राशी स्थलांतराच्या वेळी विशेष त्रास देतात. अशा वेळी घाबरून न जाता सिंह राशीच्या लोकांनी आपल्या जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून व्यवहार करावा, म्हणजे संकट काळात कोणाचा अपमान होणार नाही, वाद होणार नाही, कोणाला दुखावले जाणार नाही आणि परीक्षेचा काळ सुखासुखी पार पडेल. याचबरोबर दर शनिवारी शनी देवाचे दर्शन आणि यथाशक्ती दानधर्म करणे हितावह ठरेल.