Third Shravani Somvar 2023: निज श्रावण मास सुरू आहे. यंदाच्या चातुर्मासात श्रावण महिना अधिक मास होता. यामुळे चातुर्मासाचे महत्त्व वाढले. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये चातुर्मास, त्यातील श्रावण महिना आणि श्रावणातील शिवपूजन यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. भगवान महादेवांनी कामासूरावर विजय मिळवला होता, तसे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो, असे सांगितले जाते. निज श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार, ०४ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. या दिवशी कोणती शिवामूठ वाहिली जाते? परंपरा, मान्यता आणि महत्त्व जाणून घेऊया... (Third Shravani Somvar 2023 Date And Time)
सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. अधिक मासात व्रत-वैकल्ये केली जात नसल्यामुळे निज श्रावणात सर्व व्रते साजरी केली जात आहेत. सन २०२३ मधील तिसरा श्रावणी सोमवार ०४ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी मूग शिवामूठ म्हणून वाहिले जातात. (Third Shravani Somvar 2023 Vrat Puja Vidhi in Marathi)
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केले जाते. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी. शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा 'ॐ नमः शिवाय' हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. (Third Shravani Somvar 2023 Significance)
तिसऱ्या श्रावणी सोमवारची शिवपूजनाची व्रताचरण पद्धत
श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. (Third Shravani Somvar 2023 Shivamuth)
शिवामूठ वाहतानाचा मंत्र आणि योग्य पद्धत
लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग शिवामूठ म्हणून वाहतात. शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास, शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना करावी. शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो.