Third Shravan Somvar 2024: तिसऱ्या श्रावणी सोमवारी अनेक चांगले योग जुळून येत आहेत. या दिवशी श्रावण पौर्णिमा आहे. श्रावण पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा किंवा राखीपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षीचे विशेष म्हणजे रक्षाबंधनाला तिसरा श्रावणी सोमवार आला आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व वाढल्याचे सांगितले जात आहे.
१९ ऑगस्ट २०२४ रोजी तिसरा श्रावणी सोमवार असून, याच दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवपूजन केले जाते. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. शिवलिंग किंवा शिवप्रतिमा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा 'ॐ नमः शिवाय' हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी कसे करावे शिवपूजन?
श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे.
तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी?
श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग शिवामूठ म्हणून वाहतात. शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. शिवामूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो.