१४ डिसेंबर रोजी मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे, ती मोक्षदा एकादशी या नावे ओळखली जाते. मोक्षदा अर्थात मोक्ष देणारी एकादशी.
वर्षभरातील इतर एकादशी व्रतांप्रमाणेच ह्या एकादशीचा व्रतविधी आहे. उपवास करणे, विष्णूची पूजा करणे, विष्णूचे नामस्मरण करणे, सर्वसाधारणपणे ह्या एकादशीचे नियम असे आहेत. तरीही ही एकादशी इतर एकादशींपेक्षा वेगळी आणि विशेष ठरली आहे, ती दोन कारणांमुळे. एक म्हणजे 'मार्गशीर्ष' माझा महिना असे भगवंतांनी सांगितले आहे, त्यामुळे एकादशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच ह्याच एकादशीला प्रत्यक्ष भगवंतांनी करुक्षेत्रावर युद्धप्रसंगी अर्जुनाला गीता सांगण्यास सुरुवात केली. मनुष्यप्राण्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शक विचार गीतेमध्ये आले आहेत. त्यामुळे ती मोक्ष-दा म्हणजे मोक्ष देणारी म्हणून गौरवली जाते. ह्या दिवशी श्रीकृष्ण, व्यास आणि गीता यांची पूजा भक्तीपूर्वक केली जाते.
मार्गशीर्षातील या एकादशीला भगवंतांनी गीता गायली, त्याअर्थी गीतेचा हा जन्मदीवस म्हणून या तिथीला गीता जयंती असेही म्हणतात. आजही संपूर्ण गीता मुखोद्गत असणारी अनेक मंडळी आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगातही गीताभ्यासक मंडळी जगभरात आहेत. जे आपले मन:स्वास्थ्य गमावून बसले आहेत, त्यांनी गीतेचे नीत्य पठण केले पाहिजे. ती देखील केवळ पोपटपंची नाही, तर स्वत:च्या मनन, चिंतनातून, आचार, विचारातून व्यक्त कशी होईल, याचा विचार आणि प्रयत्न दोन्हीही प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार का होईना, पण अवश्य केले पाहिजे.
या दिवशी प्रत्येकाने गीतेचा एक अध्याय स्वतंत्रपणे किंवा सामुहिक रितीने म्हटला पाहिजे. ज्यांना संस्कृत येत नसेल, त्यांनी विनोबा भावे यांनी लिहिलेल्या गीताईचे पठण केले पाहिजे. या दिवशी अनेक शाळा-विद्यालयातून गीता-गीताई स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमुळे मुलांचे गीतेचे अध्याय पाठ होतात, शिवाय गीतेची गोडीही निर्माण होते, तसेच गीतेची तोंडओळख होते.
रोज आपल्या घरी रामरक्षेपाठोपाठ गीतेचा एक तरी अध्याय म्हणण्याचा सराव ठेवावा. पाठांतर होत नसल्यास इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या ध्वनिफिती मंद आवाजात रोज ऐकाव्यात. रोजच्या सरावाने शब्दांशी आणि शब्दांशी परिचय झाला की आपोआप अर्थाशी परिचय होणे सोपे जाईल.
स्वामी विवेकानंद शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत गेले होते, तेव्हा त्यांच्याजवळील ग्रंथ त्यांना हिणवण्यासाठी सर्व ग्रंथांच्या खाली ठेवण्यात आला. इतर धर्मीयांनी आपले विचार व्यक्त केल्यावर सर्वात शेवटी विवेकानंद उभे राहिले आणि त्यांनी उपस्थित श्रोत्यांना उद्देशून बंधू आणि भगिनिंनो असे म्हणत साऱ्या विश्वाशी नाते जोडले. त्यावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. तो थांबल्यावर धर्मग्रंथांकडे अंगुलीनिर्देश करून स्वामीजी म्हणाले, सर्व धर्मग्रंथांच्या खाली जो धर्मग्रंथ ठेवला आहे, ती भगवद्गीता आहे. तो ग्रंथ सर्वात खाली ठेवला आहे, यावरून आपल्या लक्षात येईल, की गीता सर्वधर्मग्रंथांचा पाया आहे. पाया भक्कम असला, तरच त्यावर इमारत उभी राहू शकते. स्वामीजींच्या शब्दांनी, टाळ्यांनी परदेशात भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार झाला आणि परदेशातील लोकही गीतामृत प्राशन करण्यासाठी भारतीय संस्कृतीचे पाईक झाले.
चला, तर मग आपणही आपल्या संस्कृतीचे मुल्य ओळखुया, गीतेचे सार ग्रहण करून ते आचरणात आणूया. गीतेचे तत्वज्ञान अंगी बाणले, तर मोक्ष दूर नाही. अशा प्रकारे आपणही गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी साजरी करूया आणि भारतीय संस्कृतीचा मान वाढवूया.