एकदा एक राजा आपले प्रधान व अंगरक्षक यांच्यासह शिकारीला जातो. शिकारीच्या शोधात असताना तो वाट चुकतो. त्याची आणि सैनिकांची चुकामूक होते. राजा त्यांचा शोध घेत फिरतो. सैनिक राजाला शोधत फिरतात.
बरेच अंतर चालल्यावर राजाला एका झाडापाशी साधू महाराज दिसतात. एवढ्या घनदाट जंगलात तपस्वी योगी साधना करत आहेत पाहून तो साधू महाराजांना नमस्कार करतो. साधू महाराजांना नम्रपणे विचारतो, `महाराज, मी जंगलात वाट चुकलो आहे. तुम्ही माझ्या सैनिकांनी इथून जाताना पाहिले का?'
आकाशाकडे एकटक नजर लावत साधू महाराज म्हणाले, `राजन, तुझे अंगरक्षक आणि प्रधान काही वेळापूर्वी माझ्या डाव्या हाताच्या दिशेने गेले आहेत. तू त्वरित जा, तुला ते भेटतील.'
क्षणाचाही विलंब न करता राजा साधू महाराजांना नमस्कार करून निघतो. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जात सैनिकांना आवाज देतो आणि पुढच्या काही वेळात त्याची सैनिकांशी गाठभेट होते. तेव्हा राजाच्या मनात शंका डोकावते. ती म्हणजे, `साधू महाराज अंध असूनही त्यांनी मला योग्य मार्ग कसा काय सांगितला आणि त्यांना मी माझी ओळख पटवून दिलेली नसतानाही त्यांनी मला राजन म्हणून हाक कशी मारली?'
कुतुहलापोटी राजा आपल्या सैनिकांबरोबर राजवाड्यात परतण्याआधी साधू महाराजांच्या भेटीस गेला आणि त्यांना नम्रतेने आपली शंका प्रस्तुत केली. त्यावर साधू महाराज म्हणाले, `राजा, मी अंध असलो, तरी मी समोरच्याच्या बोलण्यावरून त्याचे व्यक्तिमत्त्व ओळखू शकतो.
सुरुवातीला इथे काही लोक आले आणि म्हणाले, `ए गोसावड्या, इथून बाहेर पडायचा मार्ग कुठे? तू आमच्या राजाला पाहिले का?' त्यांच्या भाषेवरून कळले, की ते अंगरक्षक आहेत.
मग एक जण म्हणाले, `बाबाजी तुम्ही आमच्या राजेसाहेबांना पाहिले का?' यावरून कळले की ते प्रधान होते.
मग तुम्ही आलात आणि विचारले, `साधू महाराज, माझ्या सैनिकांना पाहिले?' तेव्हा मी ओळखले की तू राजा आहेस.
माणसाची भाषा त्याच्या सुसंस्कृतपणाचे परिमाण देते. म्हणून शब्दांचा वापर जपून करायचा असतो. `शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी' असे कवी म्हणतात ते उगीच नाही. सोडलेला बाण आणि फेकलेला शब्द परत घेता येत नाही. शब्द घाव करू शकतात आणि मलमही लावू शकतात. म्हणून त्यांचा चपखलपणे वापर केला पाहिजे. शब्द सुधारले तर भाषा सुधारेल आणि भाषा सुधारली तर व्यक्तिमत्त्व सुधारेल...!