एका राजाने आपल्या वयात आलेल्या राजपूत्रांना शिस्त लावावी, म्हणून एक कार्य सोपवायचे ठरवले. त्याने एकदा तिघांना बोलावून घेतले आणि एक काम सोपवले.
तिघांनी कामाची तयारी दाखवली आणि काय काम आहे असे विचारले. राजा म्हणाला, आपल्या राज्यात नासपतीचे झाड नाही. तुम्ही तिघांनी चार महिन्यांच्या अंतराने आपल्या राज्याच्या आसपास कुठे नासपतीचे झाड आहे का हे पाहून यायचे.
तिघांनी आव्हान स्वीकारले. पहिला राजकुमार गेला. बराच शोध घेऊन तो राज्यात परतला. चार महिन्यांनी दुसरा राजकुमार गेला, तोही शोध घेऊन परतला आणि चार महिन्यानी तिसरा राजकुमार गेला व त्यानेही नासपतीच्या झाडाची माहिती मिळवली. तिघांचा शोध पूर्ण होईपर्यंत वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर एक दिवस राजाने दरबार भरवला आणि तिघांना आलेले अनुभव कथन करायला सांगितले.
पहिला राजकुमार म्हणाला, `पिताश्री आपल्या राज्याबाहेर एक नासपतीचे झाड आहे. गावकऱ्यांकडून खात्री केल्यावर मला त्या झाडाची ओळख पटली कारण मी पाहिले, तेव्हा ते अतिशय शुष्क झाले होते आणि ओळखणेही अवघड होते. अशा झाडाचा शोध घ्यायला तुम्ही का पाठवले असेल, हे मला लक्षात आले नाही.'दुसरा राजकुमार म्हणाला, `पिताश्री, माझा अनुभव वेगळा आहे. आपल्या राज्याबाहेर एक नासपतीचे झाड आहे, पण ते शुष्क नसून छान हिरवे गार होते. फक्त त्याला नासपती लगडले नव्हते.'तिसरा राजकुमार म्हणाला, `पिताश्री, मला वाटते या दोघांच्या पहाण्यात काही चूक झाली असावी. कारण मी पाहिलेले झाड नासपतीचे होते. ते शुष्क नव्हते व फळरहितही नव्हते. उलट हिरवेगार आणि फळांनी लगडलेले होते.'
तिघांचे बोलणे ऐकून झाल्यावर राजाने निष्कर्ष काढत म्हटले, `मुलांनो, तुम्ही घेतलेला शोध योग्य होता. परंतु एक गोष्ट तुम्ही विसरला आहात, ती अशी की तुम्ही तिघांनी एकच झाड चार महिन्यांच्या फरकाने पाहिले असल्याने तुम्हाला त्यात ऋतुमानानुसार घडलेले बदल दिसले. यावरून मला तुम्हाला आणि दरबारात उपस्थित असलेल्या सर्वांना तीन नियम सांगायचे आहेत.
१. कोणत्याही परिस्थितीवर चटकन विश्वास ठेवू नका. त्याचा पूर्ण तपास करा आणि शेवटी निकष काढा.२. कोणाचीही परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. म्हणून कोणालाही कमी लेखू नका.३. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात. ऋतुमानानुसार जसे बदल घडतात तसेच माणसाच्या आयुष्यातही घडतात. म्हणून उतू नका आणि मातू नका.