शाकंभरी देवीची तीन शक्तीपीठे आहेत. पहिले राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात उदयपूर वाटीजवळ सकराय माता नावाने ओळखली जाते. दुसरे देखील राजस्थान मध्येच आहे. मात्र ते सांभर जिल्ह्यात समीप शाकंभर नावाने स्थित आहे. तिसरे स्थान उत्तरप्रदेशातील मेरठ येथे सहारनपुरपासून ४० किलोमीटर दूर स्थित आहे.
पहिले शक्तीपीठ : असे म्हटले जाते की महाभारत काळात पांडव आपल्या नातेवाईकांच्या हत्येचे पातक विमोचनासाठी अरावली नामक पर्वतात राहिले होते. तिथे युधिष्ठीराने माता शर्कराची मूर्ती स्थापन करून तिची पूजा केली होती. ती आता शाकंभरी देवी म्हणून ओळखली जाते.
माता शाकंभरी गाव सकराय हे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते. मोठमोठ्या पर्वतरांगांच्या मध्ये शेखावटी प्रदेश स्थित आहे. त्याच्या सीकर नामक जिल्ह्यात हे मंदिर स्थित आहे. तेथील आमराई, धबधबे, निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षून घेते. या शक्तीपीठावर नाथ संप्रदायाचा प्रभाव आढळतो. ही देवी खंडेलवाल वैश्यांची देवी म्हणूनही ओळखली जाते.
या मंदिराचे निर्माण सातव्या शतकात झाल्याचे, तिथल्या शिलालेखावरून समजते. या मंदिराजवळ जटाशंकर मंदिर तसेच आत्ममुनी आश्रम आहे. नवरात्रीतील नऊ दिवस हा परिसर भाविकांनी गजबजलेला असतो.
दुसरे शक्तीपीठ : दुसरे शक्तीपीठ राजस्थानमधील सांभर जिल्ह्यात आहे. हे तेथील प्रसिद्ध देवस्थान आहे. देवीच्या नावावरून जिल्ह्याचे नामकरण झाले असेही म्हटले जाते. याच नावावरून तिथे प्रसिद्ध धबधबा आहे.
महाभारतानुसार हे क्षेत्र असूर राज वृषपर्वाच्या साम्राज्याचा एक भाग होता. तिथे असूरांचे गुरु शुक्राचार्य यांचा मुक्काम असे. याचठिकाणी त्यांची कन्या देवयानी आणि ययाति यांचा विवाह पार पडला होता. त्याच जागेवर शाकंभरी देवीची स्वयंभू मूर्ती सापडली होती, तेच आज देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. शाकंभरी मंदिराव्यतिरिक्त या परिसरात ययातिच्या दोन्ही पत्नींच्या नावे उभारलेले विशाल सरोवर आहे. ते देखील पर्यटकांना आकर्षून घेते.
सरे शक्तीपीठ : तिसरे शक्तीपीठ उत्तरप्रदेशात मेरठजवळ स्थित आहे. या ठिकाणी शाकंभरी देवी, भीमा देवी, भ्रामरी देवी, शताक्षी देवी यांची मंदिरेही स्थित आहेत. तिथेच शाकंभरी नावाची नदी आहे. तिचे पाणी डोंगर, पर्वतरांगा पार करून, धबधब्याच्या वाटेने दुथडी भरून वाहत असते. शिवालिक पर्वतस्थित हे शक्तीपीठ आहे.