मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे सुपुत्र पं. हृदयनाथ मंगेशकर यांना जेमतेम पाच वर्षे वडिलांचा सहवास मिळाला. त्यांच्या पश्चात उस्ताद अमीरखाँ यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताची घेतलेली तालीम घेतली. तसेच समकालीन संगीतकारांच्या स्वररचनांचा हृदयनाथांनी केलेला अभ्यास केला.त्या अभ्यासातून हृदयनाथांनी स्वतंत्र संगीत शैली विकसित केली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी ‘निसदिन बरसात नैन हमारे’ व ‘बरसे बूंदिया सावन की’ या भक्तिगीतांना चाल बांधली. ती गाणी लोकप्रियदेखील झाली. हृदयनाथांना ख्यातनाम संगीतकारांचा सहवास लाभला. त्या सहवासात त्यांचे सांगितिक ज्ञान आणखी विकसित झाले. त्यांनी आपल्या प्रयोगशील पद्धतीतून संगीताला वेगवेगळ्या पद्धतीने साज चढवला. त्यात भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत तसेच पाश्चिमात्य संगीत यांचा मिलाप होता.
भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना खडीकर यांच्या पाठीवरचा सर्वात धाकटा भाऊ आणि मंगेशकर घराण्याचे हृदय म्हणून घरचे त्यांना `बाळ' अशी प्रेमळ साद घालत असत. सरस्वतीच्या लेकी, गानसमाज्ञी बहिणींच्या पाठोपाठ आपलीही सांगितिक कारकिर्द घडवताना हाच बाळ पुढे संगीत क्षेत्रात 'बाळासाहेब' म्हणून नावरूपाला आला. शंकराचार्यांनी तर, संगीताला वाहून घेतलेल्या या `हृदयाला', 'भावगंधर्व' अशी उपाधी दिली. तसेच पं. भीमसेन जोशी व पं. जसराज यांनी `पंडीत' असा सन्मान केला.
हृदयनाथांच्या संगीतात अनेक संतांचे अभंग, ओव्या, विराणी यांचा तर समावेश आहेच, शिवाय अनेक प्रसिद्ध कविंच्या कवितांना त्यांनी संगीताचा साज चढवून न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकायला जेवढी गोड आहेत, तेवढीच गायला आणि वाजवायला अतिशय अवघड आहे. त्यांनी संगतीबद्ध केलेल्या रचनांचे शिवधनुष्य त्यांच्या ज्येष्ठ भगिनीच पेलवू जाणे. तसे असले, तरीदेखील, किशोरी आमोणकर, अनुराधा पौडवाल, पद्मजा फेणाणी, ज्योत्स्ना हर्डीकर, राधा मंगेशकर आदी गायिकांना आणि सुरेश वाडकर, महेंद्र कपूर, अरुण दाते, रवींद्र साठे आदी गायकांनी हृदयनाथांची गाणी गायली आहेत.
हृदयनाथांच्या संगीताने रसिकांच्या मनात `विश्वाचे आर्त प्रकाशिले' आणि `मी डोलकर' सारख्या कोळीगीतावर तालही धरण्यास भाग पाडले. त्यांचे संगीत ऐकणाऱ्याच्या मनात `मोगरा फुलल्या' वाचून राहत नाही, तसेच स्वा. सावरकरांच्या लेखणीतून उतरलेली `सागरा प्राण तळमळला' या गाण्यातील आर्तता विन्मुख करायला लावते. कविच्या शब्दाचे सामर्थ्य संगीतकाराच्या भूमिकेतून पेलत असताना, हृदयनाथांनी नेहमीच 'या हृदयीचे त्या हृदयी' भावना अलवारपणे पोहोचवल्या. अशा हृदयस्थ संगीतकाराला जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा!