आपण आपल्या व्यक्तिमत्वाला जेवढं अधिक महत्व देतो तेवढं आपण स्वतःला भूतकाळाच्या प्रभावामध्ये जखडून टाकतो. सद्गुरु सांगतात कि आपण जर हा भार बाजूला ठेवू शकलो तर आपण जीवन आणि मृत्यू सहजपणे तरून जाऊ शकतो.सद्गुरु: आत्ता तुम्ही ज्याला "मी" म्हणून संबोधत आहात, ते फक्त तुमच्या मनात तुम्ही गोळा केलेली एक विशिष्ट माहिती आहे. जेंव्हा तुम्ही म्हणता “मी एक चांगली व्यक्ती आहे,” “मी एक वाईट व्यक्ती आहे,” “मी अभिमानी आहे,” “मी विनम्र आहे,” किंवा काहीही असा, तर हे फक्त मनाच्या काही विशिष्ट रचना आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, हे भूतकाळाचा संचय आहे - तुम्ही फक्त तुमच्या भूतकाळात जगत आहात. जर भूतकाळ काढून घेतला तर बहुतेक लोकं हरवल्यासारखे होतील. त्यांच्यासाठी सर्वकाही भूतकाळावर अवलंबून असते. व्यक्तिमत्व भूतकाळावर आधारित असतं. तर जोपर्यंत व्यक्तिमत्व महत्वाचं आहे याचा सरळ अर्थ असा आहे कि पूर्वीचा क्षण सर्वकाही ठरवत आहे. वर्तमान क्षणाला बिलकुल महत्व नाही.
जे व्यक्तिमत्व घेऊन तुम्ही फिरता ती तर एक मृत गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या खांद्यावर एक मृतदेह घेऊन फिरता तेव्हा तुम्ही फार दूर जाऊ शकत नाही. आणि तुम्ही केवळ दफनभूमीच्या दिशेनेच जाऊ शकता. जर तुम्ही फार काळ मृतदेह वाहून नेला तर तुम्हाला त्याचा भयानक वासही सहन करावा लागेल. तुमचं व्यक्तिमत्व जेवढं अधिक मजबूत बनतं तेवढा त्याचा वास जास्त येतो.
जेव्हा तुम्ही तुमचा भूतकाळ मागे टाकता तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. हे सापाने कात टाकण्यासारखे आहे. एका क्षणी सापाची त्वचा त्याच्या शरीराचा भाग आहे, तर पुढील क्षणी तो कात टाकतो आणि मागे न बघता निघून जातो. जर प्रत्येक क्षणी, कोणी एखादा साप कात टाकतो तसा राहिला तरच त्याची प्रगती होईल. जेव्हा एखादी व्यक्ती भूतकाळाचे ओझे वाहत नाही तेव्हा ती खरोखर निष्पाप असते. निष्पाप असणे म्हणजे असे नाही कि त्याने आयुष्यात काहीच केले नाही. ते तर मृत व्यक्ती असण्यासारखे होईल. एखाद्या व्यक्तीला जीवन जाणून घेण्यासाठी शक्य असलेल्या सर्व गोष्टी त्याने केल्या, पण त्याने त्याच्या कृतीतून मागे कोणतेही अवशेष सोडले नाहीत, किंवा त्याने केलेल्या कृतीतून व्यक्तिमत्वही निर्माण केले नाही.
तुम्ही शुकाबद्दल ऐकले आहे का? तो व्यासांचा मुलगा होता. सुका एक निर्मळ जीव होता, एक खरोखरच निष्पाप जीव. त्याच्या आयुष्यात एक विशिष्ट घटना घडली. एके दिवशी तो जंगलात एकटाच नग्न चालत होता. तो चालत असताना जवळ एका तलावामध्ये काही जलकन्या किंवा अप्सरा स्नान करत होत्या. जंगलात एकटेच असल्याकारणाने त्या स्त्रिया तलावामध्ये एकत्र नग्न आंघोळ करत होत्या आणि पाण्यात खेळत होत्या. शुक तलावाजवळ आला त्याने त्यांच्याकडे पाहिलं आणि तो तिथून निघून गेला. त्या स्त्रियांना लाज वाटली नाही, त्यांनी स्वतःला लपवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यांनी फक्त त्यांचा खेळ चालू ठेवला. शुक तिथून चालत निघून गेला.
शुकाचा शोध घेत त्याचे वडील व्यास त्याच्या पाठोपाठ आले. ते सत्तर वर्षांहून अधिक वयाचे होते, म्हातारे आणि एक महान संत. शुकाच्या मागोमाग जाताना तेही त्या तलावा जवळ आले. जेव्हा त्या स्त्रियांनी त्यांना पाहिलं तेव्हा त्यांनी ताबडतोब आपल्या कपड्यांकरिता धाव घेतली. व्यासांनी त्यांना विचारलं, "मी एक म्हातारी व्यक्ती आहे, आणि कपडेही व्यवस्थित घातले आहेत. आणि माझा मुलगा तर तरूण आणि नग्न होता. जेव्हा तो तुमच्या जवळ आला तेव्हा तुम्हाला कोणताही व्यत्यय आला नाही, पण जेव्हा मी आलो, तर तुम्ही असे वागत आहात. का?" त्या म्हणाल्या, त्याने स्वतःची कोणतीही लैंगिक ओळख ठेवली नाही. आम्हाला त्याच्यामुळे काहीही वाटलं नाही. तो अगदी लहान मुलासारखा आहे.
केवळ तीच व्यक्ती जी मागील क्षण या क्षणापर्यन्त बाळगत नाही, तीच सर्व गोष्टींपासून मुक्त आहे. आणि त्याचा हा गुणधर्म सर्वत्र जाणवेल. काही क्षणांच्या भेटीतच लोकं तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतील इतका कि त्यांनी त्यांच्या पालकांवर, पती किंवा पत्नी यांच्यावर देखील केला नसेल, याचं कारण तुम्ही तुमच्यासोबत भूतकाळाचे ओझे वाहत नाही.
वासा चालता हो!
जर तुम्ही भूतकाळ तुमच्यासोबत घेऊन फिरलात तर तुम्हालाही इतरांसारखा गंध चढेल. संपूर्ण जगात व्यक्तिमत्वांची दुर्गंधी पसरली आहे. प्रत्येकाला स्वतःचा असा तीव्र गंध किंवा व्यक्तिमत्व आहे. या जगातील विविध प्रकारच्या दुर्गंधी आहेत आणि त्यांच्यात सतत चकमक होतच असते. तुमचा राग, द्वेष, मत्सर, भीती - सर्वकाही तुमच्या भूतकाळावर आधारित आहे. ज्या वेळेस तुम्ही भूतकाळ आणि भविष्यकाळ वाहाता, तुम्ही खऱ्या अर्थाने गाढव बनता कारण ते ओझेच तसे आहे. कोणीही हे ओझे घेऊन त्याचे आयुष्य हुशारीने जगू शकेल, असा कोणताही मार्ग नाही.
जेव्हा कोणी हा गंध घेऊन फिरत नाही, तेव्हा तो या अस्तित्वालाही ओलांडू शकतो. कोणत्याही प्रयत्नांशिवाय हि व्यक्ती संसाराचा महासागर पार करते. जे दुसऱ्या कोणासाठी कठोर प्रयत्न वाटतात ते ह्या व्यक्तीसाठी सहजच घडत असते. ती व्यक्ती फक्त या जगातूनच सहजपणे पार होत नाही, तर ती व्यक्ती जन्म आणि मृत्यूच्या प्रक्रियेतून सहजच पार होते.