Tirumala Tirupati Ladu Balaji Prasad: भारतात अनेक गोष्टींना संस्कृती, परंपरा यांमध्ये महत्त्व आहे. वर्षानुवर्षे, शतकानुशतके गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. त्यातूनच संस्कार होत असतात. भारतात आपापल्या आराध्यांचे पूजन, नामस्मरण, उपासना यांचे महत्त्व अन् महात्म्य अनन्य साधारण आहे. आपापल्या कुळाचार कुळधर्माप्रमाणे आराध्य देवतांची सेवा केली जाते. भारतात हजारो मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये नित्यनेमाने पूजन, विविध विधी केले जात असतात. भाविकही त्यात सक्रीय सहभाग घेतात. घरात किंवा देवळात देवाची आरती केल्यानंतर मिळणारा प्रसाद अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
आपल्याकडे सत्यनारायण व्रत आणि सत्यनारायण पूजा करण्याची मोठी परंपरा आहे. या सत्यनारायण पूजा कथेत प्रसादाचे महत्त्व पटवून देणारी एक कथा आली आहे. केवळ मनोभावे पूजन, आरती केली म्हणजे झाले असे नाही, तर देवतेचा प्रसाद ग्रहण करणेही संस्कृतीत महत्त्वाचा संस्कार मानला गेला आहे. देवतांना आवडणारे पदार्थ, गोष्टी या प्रसाद म्हणून अर्पण केल्या जातात. त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि तोच पुढे प्रसाद म्हणून वाटला जातो. नारायणाचेच एक स्वरुप मानल्या गेलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसाद म्हणून दिला जातो. तिरुपती बालाजी लाडू प्रसाद अत्यंत पवित्र, शुभ मानला जातो. खुद्द लक्ष्मी देवीने लाडू तयार केला होता, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील श्रीमंत मंदिर
दक्षिण भारतातील मंदिरे, मंदिरांचे स्थापत्य, कलाकुसर, कर्मठपणाने केले जाणारे पूजन, आरास यांची जगभरात चर्चा होत असते. असेच एक मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर. तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वांधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. वर्षाला कोट्यवधी भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन घेतात. कोट्यवधी रुपये दान केले जातात. तसेच या ठिकाणी केस अर्पण करण्याची प्रथा आहे. तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. स्थानिक मान्यतेनुसार, येथे मंदिरात स्थापित काळ्या रंगाची दिव्य मूर्ती कोणीही तयार केली नसून ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली होती. स्वतः प्रकट झाल्यामुळे या मूर्तीचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. तिरुमला तिरुपती लाडू प्रसादम याबाबत काही लोककथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते.
तिरुपती बालाजी लाडू प्रसादाचे महात्म्य
तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादाचे महत्त्व अनन्य साधारण मानले गेले आहे. महाप्रसादाचे हे लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' असे म्हटले जाते. यात सर्व गोष्टी विशिष्ट प्रमाणातच घेतल्या जातात. सर्वप्रथम बेसनापासून बुंदी तयार केली जाते. लाडू खराब होऊ नयेत यासाठी गुळाच्या पाकाचा वापर केला जातो. यानंतर त्यात आवळा, काजू आणि मनुका टाकल्या जातात. बुंदी बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. गेल्या ३०० वर्षांत केवळ सहा वेळा हा लाडू करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. तिरुपतीचा लाडू प्रसादम १८ व्या शतकापासून दिला जातो, अशी मान्यता आहे. विशेष प्रसाद म्हणून लाडू देण्याची परंपरा कधी सुरू झाली, याबाबत स्पष्टता नसल्याचे म्हटले जाते. कोणताही भाविक देवळात गेल्यावर कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी, आप्तेष्टांना देण्यासाठी प्रसाद म्हणून तेथील सर्वाधिक लोकप्रिय किंवा संस्थानकडून देण्यात येणारी गोष्ट आवर्जून घेऊन येतो.
व्यंकटेश्वर बालाजीचा आशीर्वाद रुपी लाडू
भारतीय समाजात लाडू शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. तुपात भाजलेले छोटे तुकडे किंवा पिठी एकत्र करून लाडू बनवले जातात. एकता आणि संघटनेचे ते प्रतीक मानले जाते. तिरुपती लाडू खूप शुभ आणि पवित्र मानले जातात. असे मानले जाते की, या प्रसादाचे सेवन केल्याने भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो. तिरुमला तिरुपती लाडू हा व्यंकटेश्वर बालाजी देवाच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे. तिरुपती लाडू हा केवळ स्वादिष्ट प्रसादच नाही तर त्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे. बालाजीकडून प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी ती स्वीकारण्यामागील श्रद्धा आहे.
बाळकृष्णाची कथा आणि बालाजी मंदिरातील प्रसादाचे धार्मिक महत्त्व
तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या धार्मिक महत्त्व आहे. या संबंधित अनेक लोककथा आहेत, ज्यामुळे ते आणखी खास बनतात. प्रसादात लाडू ग्रहण करण्यामागे भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीची एक कथा सांगितली जाते. असे म्हणतात की, एकदा नंद बाबा आणि आई यशोदा भगवान विष्णूची पूजा करत होते. जवळच कन्हैया खेळत होता. नंद बाबांनी यशोदा मातेने केलेले लाडू श्रीविष्णूंना अर्पण केले. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा बाळकृष्ण पूजेच्या ठिकाणी बसून आनंदाने लाडू खाताना दिसला. ते पाहून प्रथम नंद बाबा आणि यशोदा हसले. परंतु, ही गोष्ट वारंवार घडली. त्यानंतर श्रीकृष्ण नंदबाबा आणि यशोदा मातेसमोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले आणि म्हणाले की, माझ्यासाठी खूप चवदार लाडू बनवले आहेत. आतापासून हा लाडू नैवेद्य मला लोण्यासारखा प्रिय असेल. तेव्हापासून बाळकृष्णाला लोणी आणि साखरेची मिठाई आणि चतुर्भुज श्रीकृष्णाला लाडू अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली.
खुद्द लक्ष्मी देवीने केले होते लाडू
दुसऱ्या एका लोककथेनुसार, एकदा तिरुमला टेकडीवर वेंकटेश्वराची मूर्ती बसवली जात असताना, देवाला प्रसाद म्हणून काय अर्पण करावे या प्रश्नाने मंदिराचे पुजारी संभ्रमात होते. तेव्हा एक वृद्ध आई ताट घेऊन आली. तिच्या हातात लाडू होता. तिने पहिला नैवेद्य दाखवला. गुरुजींनी तो नैवेद्य अर्पण करून लाडू प्रसाद म्हणून दिला आणि स्वतःही प्रसाद ग्रहण केला. त्यानंतर त्याची दैवी चव पाहून थक्क झाले. वृद्ध आईला काही विचारणार तोच ती अंतर्धान पावली. असे मानले जाते की, देवी लक्ष्मीने स्वतः ते लाडू करून नैवेद्य दाखवण्यासाठी आणला होता. त्यानंतर भगवान बालाजींनी स्वतः पुरोहितांना लाडू बनवण्याची पद्धत शिकवल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून लाडू हा वेंकटेश्वराचा विशेष प्रसाद मानला जाऊ लागला आणि भक्तांमध्ये वाटण्याची परंपरा सुरू झाली, असे म्हणतात.
तिरुमला तिरुपती लाडू प्रसादाची वेगळी ओळख
तिरुपती मंदिरात भगवान श्रीकृष्णाचे चार हात असलेले रूप स्थापित आहे. भगवान विष्णूचे शाश्वत रूप आहे. तिरुपती म्हणजे तिन्ही जगाचा स्वामी. येथे तो व्यंकटेश श्रीनिवास बालाजी म्हणून पत्नी पद्मा आणि भार्गवीसोबत विराजमान आहे. पद्मा आणि भार्गवी हे लक्ष्मीचे अवतार आहेत. श्रीनिवास व्यंकटेश हे स्वतः महाविष्णू आहेत. तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादाला सन २००९ मध्ये Geographical Indication - GI टॅग मिळाला. याचा अर्थ तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात देण्यात येणाऱ्या लाडू प्रसादाची वेगळी ओळख आहे आणि हा लाडू फक्त तिरुमला वेंकटेश्वर मंदिरातच बनतो. या टॅगमुळे तिरुपती लाडू वेगळेपण आणि गुणवत्ता जपली जाते, याची खात्री मिळते.
दरम्यान, एका रिपोर्टनुसार तिरुपती तिरुमला बालाजी मंदिरात दररोज ३ लाखांहून अधिक लाडू तयार केले जातात. या लाडू प्रसाद विक्रीतून तिरुमला तिरुपती देवस्थानाला अंदाजे ५०० कोटी मिळतात. तिरुपती लाडूल GI टॅग मिळाला आहे. यामुळे आता या नावाने कुणीही लाडू विकू शकत नाही. या लाडूंमध्ये मुबलक प्रमाणात साखर, काजू आणि मनुके असतात. एका लाडूचे वजन साधारणपणे १७५ ग्रॅम एवढे असते.