भगवान विश्वकर्मा हे या सृष्टीचे पहिले स्थापत्यकार मानले जातात. चारही युगांमध्ये त्यांनी निर्मित केलेल्या वास्तूंचे दाखले आहेत. त्यांनी कृष्णाची द्वारका, पांडवांची मयसभा, देवी देवतांसाठी आलिशान महाल, स्वर्गलोक, लंका, हस्तिनापूर, इंद्रपुरी, जगन्नाथ पुरी वसवली. जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथाच्या मंदिरातील कृष्ण, सुभद्रा आणि बलरामाची मूर्ती त्यांनीच निर्माण केली आहे. तसेच भगवान शंकरासाठी त्रिशूळ, भगवान विष्णूंसाठी कवच कुंडल, महारथी कर्ण साठी कवच कुंडलांची निर्मिती त्यांनीच केली होती. त्यांची वैज्ञानिक आणि स्थापत्य शास्त्रातील दूरदृष्टी पाहून त्यांना ऋग्वेदात स्थान दिले आहे. त्यांची कारागिरी पाहून त्यांना वास्तूदेवाचे सुपुत्र असेही म्हटले जाते.
माघे शुकले त्रयोदश्यां दिवापुष्पे पुनर्वसौ।अष्टा र्विशति में जातो विशवकर्मा भवनि च॥
धर्मशास्त्रानुसार मग शुक्ल त्रयोदशीला भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी केली जाते. यादिवशी भगवान विश्वकर्मा यांची पूजा केली जाते. मुख्यत्वे व्यापारी वर्गात अतिशय आस्थेने विश्वकर्मा जयंतीचा दिवस साजरा केला जातो. तसेच त्यांच्या आशीर्वादाने काम व्हावे, यासाठी कार्यालयात विश्वकर्मा यांची तसबीरही आढळते. विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी या प्रतिमेचे सामूहिकपणे साग्रसंगीत पूजन केले जाते.
आपण व्यापारी असो अथवा नसो, या सुंदर सृष्टीच्या रचेत्याप्रती कृतद्न्यता व्यक्त करण्यासाठी आपणही भगवान विश्वकर्मा यांची मनोभावे पूजा करूया. पूजा विधी नेहमीचाच आहे. फक्त त्याला काही मंत्रांची जोड द्यावी. जसे की, ॐ आधार शक्तपे नमः , ॐ कूमयि नमः, ॐ अनंतम नमः, ॐ पृथिव्यै नमः। या मंत्रांचे उच्चारण करून मनःपूर्वक नमस्कार करावा आणि या सृष्टीचे त्यांनी सदैव पालन आणि रक्षण करावे, म्हणून प्रार्थना करावी.
भगवान विश्वकर्मा की जय।।