आज षटतिला एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी दोन वेळेचा उपास करतात आणि द्वादशीला उपास सोडतात हे आपल्याला माहीत आहेच. परंतु काही कारणाने आजचा उपास करता आला नसेल, तर वाईट वाटून घेऊ नका परंतु पुढील चुका अवश्य टाळा!
षटतिला एकादशीचे महत्त्व :
पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते. त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल, हे बघितले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षटतिला एकादशी! मकरसंक्रांतीच्या निमित्ताने लाडवांचा गोडवा या मासाला लाभला आहे, तो वेगळाच! निसर्गचक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत आरोग्यदायी असल्यामुळे आरोग्यासाठी म्हणून हे व्रत जरूर करावे.
षटतिला एकादशीनिमित्त हवन विधी :
तसेच या व्रताला तिलधीव्रत असेही म्हटले जाते. यानुसार षटतिला एकादशीला तीळ मिश्रित गोवऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते. परंतु आताच्या काळात शहरात गाईचे शेण मिळणे दुरापास्त आहे. तसेच त्याच्या गोवऱ्या स्वत: करणे देखील कोणी पसंत करणार नाही. त्याऐवजी पूजा हवन साहित्याच्या दुकानातून तयार शेण्या आणून त्याच्या बरोबर तीळ गेऊन दोन्हीचे एकत्रित हवन करणे सोपे होईल. अर्थात हवनही माफक प्रमाणात करणे उचित होईल. अन्यथा शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. थंडीच्या दिवसात सर्दी खोकला तसेच अनेक आजार होत राहतात. हवनाच्या निमित्ताने गोवऱ्यांचा वापर केल्याने वातावरणशुद्धी होते. घर प्रसन्न वाटते. असा अध्यात्मिक आणि शास्त्रीय हेतू पाहता षटतिला एकादशीचे व्रत आपल्यालाही सहज अनुसरता येईल.
महत्त्वपूर्ण नियम
>>आजच्या दिवशी तिळाचे दान केले असता ते थेट भगवान विष्णूंना मिळते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आज तुम्ही हळदीकुंकू समारंभ करत असाल तर तिळाचे दान करायला विसरू नका.
>>एकादशीचा उपास आपल्या प्रकृतीसाठी अतिशय लाभदायक असतो. परंतु काही कारणाने उपास मोडला असेल किंवा करता आला नसेल तर निदान आजच्या दिवशी मांसाहार करू नका. जेवणात भाताचा समावेश करू नका.
>>एकादशीचे व्रत अध्यात्मिक उन्नतीसाठी केले जाते. व्रतस्थ जीवन जगण्याची ती शिकवण असते. तिचे अनुसरण करण्यासाठी आजच्या दिवशी तामसी भोजन टाळा. ब्रह्मचर्य पाळा. आपले दैनंदिन काम पूर्ण करून भक्तिभावे विष्णूंचे स्मरण करा.
>>अन्य स्तोत्र पाठ नसली तरी 'ओम विष्णवे नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप अवश्य करा.