आज वैशाख पौर्णिमा. आजच्याच दिवशी भगवान बुद्ध यांचा जन्म झाला होता. म्हणून ही तिथी बुद्ध पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते. आजच्या दिवशी एक वेगळाच योग जुळून आला आहे, ज्याला चतुर्ग्रही योग असे म्हणतात. चतुर्ग्रही योग म्हणजे एका राशीत चार ग्रहांची उपस्थिती. बुध, सूर्य, शुक्र आणि राहू हे चार ग्रह आज वृषभ राशीत प्रवेश करत आहेत, त्यामुळे हा योग जुळून आला आहे. या ग्रहस्थितीचा लाभ वृषभ राशीला तर होणार आहेच, शिवाय अन्य राशींवरही त्याचा अनुकूल प्रभाव पडणार आहे. त्यासाठी आपणही उपासना करणे गरजेचे आहे.
आज पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धि आणि अमृत सिद्धि योग आहे. हा योग आजच्या दिवसाला अधिक शुभ बनवित आहे. या दिवशी गंगास्नान केले असता शेकडो पटीने दान केल्याचे फळे मिळते. नदीत स्नान करायला जाऊ शकत नसेल तर घरातल्या पाण्यात देवघरातील गंगोदक घाला. तेही शक्य नसेल तर स्नान करते वेळी गंगा नदीचे स्मरण करा. या मानसपूजेचाही लाभ होऊ शकेल. आजच्या तारखेला बरीच शुभ कामेही केली जाऊ शकतात. विशेषत: वास्तुपूजा, गृहप्रवेश, महत्त्वपूर्ण खरेदी करता येईल. या दिवशी उपास करा आणि भगवान विष्णूची पूजा करा. उपास शक्य नसेल तर केवळ जप करून विष्णूंची मनोभावे आराधना करा.
गोमातेची सेवा कधीही करणे पुण्यप्रदच मानले जाते, परंतु आजच्या दिवशी गोपूजेला किंवा गायीला चारा खाऊ घालण्याला विशेष महत्त्व आहे. गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होऊन अन्नदानाचे पुण्य प्राप्त होते. आजच्या दिवशी शक्य झाल्यास घरातल्या घरात का होईना श्री सत्यनारायण पूजा करावी किंवा सत्यनारायण कथा ऐकावी. देवाला यथाशक्ती नैवेद्य अर्पण करावा आणि हातून काय सत्कर्म घडत राहावे अशी प्रार्थना करावी.
आजच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला अधिक महत्त्व असल्यामुळे 'ओम नमो भगवते वासुदेवाय नम:' या मंत्राचा जप करावा. 'ओम विष्णवे नम: ओम नारायणा विद्महे। वासुदेवया धीमही। तन्नो विष्णू प्रचोदयात' ही गायत्री पठण करावी. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणावे किंवा ऐकावे. आणि श्री विष्णूंची आरती म्हणून आजच्या पूजेची सांगता करावी.