आजच्या काळातही वैदिक हिंदू धर्म टिकवून ठेवण्यात दक्षिणेकडील लोक अग्रेसर आणि आग्रही आहेत. महाराष्ट्रातील संत परंपरेप्रमाणे दक्षिणेतही मोठी संत परंपरा लाभल्याचे दिसून येते. भारतावर परकीय आक्रमण झाले असताना धर्म टिकवण्याचे आणि पुनश्च रुजवण्याचे काम संतांनी केले.तेथील संतांनी धार्मिक ग्रंथ, स्तोत्र, पुराण यांचे जतन करून वैदिक हिंदू धर्म जागृत ठेवला. अशाच संतांपैकी श्रीविजयींद्रतीर्थ स्वामी यांची आज पुण्यतिथी.
१५-१६व्या शतकात दक्षिणेत सनातन धर्माचा ध्वज फडकवत ठेवण्यात व्यासराज स्वामींचा सिंहाचा वाटा होता. साम्राज्यलक्ष्मी बरोबरीनेच विद्याराज्य लक्ष्मीही सुरक्षित ठेवण्याची परंपरा व्यासराज स्वामींनी सुरू केली. ही परंपरा त्यांच्या शिष्यांनीही अखंडित ठेवली. त्यातलेच एक शिष्य म्हणजे श्रीविजयींद्रतीर्थ स्वामी. त्यांचे अनेक अनुयायी महाराष्ट्रातही आहेत.
६४ कलांमध्ये पारंगत असणाऱ्या स्वामींनी १०० हून अधिक ग्रंथ रचले. 'जयीन्द्रयोगिरूपावतीर्ण एष पूर्णधीः' असं म्हणत तत्कालीन शैवाद्वैत मताच्या विद्वान अप्पय्या दिक्षितांनीही त्यांना गौरवलं. नारायण या शब्दाचा अर्थ १०० हून अधिक प्रकारे निरूपणात्मक रूपातून सांगितला.
रामराय या विजयनगर साम्राज्याच्या अधिपतीस त्याची राणदुल्ला खानाबरोबरीची मैत्री सोडून देण्यास सांगितले असताही त्याने ते न ऐकल्याने विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास झाला. तरीही भगवंताच्या कृपेने परकीय आक्रमणापासून गावकऱ्यांच्या मदतीने तपःसामर्थ्याच्या जोरावर मंदिरांचे रक्षण केले. अशाप्रकारे साम्राज्य आणि विद्याराज्य लक्ष्मीची सेवा करत लक्ष्मीपती नारायणाचा महिमा सदैव गायला.अशा स्वामींचा आज आराधना अर्थात समाधी दिवस.
त्यांनी रचलेल्या पापविमोचन स्तोत्रातील एका श्लोकाचा आणि स्तोत्राचा थोडक्यात भावार्थ बघून त्याचे चिंतन या पर्वकाळी करूया.
परिशेषित ईश मध्यकालः सुकृते भारतभूतले वरिष्ठःतदहापि सदैव पापचित्ते मयि पश्वन्त्यजयोश्च कोपराधः
हे देवा, भारतभूमी सारख्या श्रेष्ठ भूमीत माझा जन्म झाला आहे. इतरांना पापी, मूर्ख म्हणण्यातच आयुष्यातली वर्षे, वेळ, कष्ट वाया घालवले आहेत. मीही पाप करत आलो असताना इतरांना असे बोलून मी काय मिळवले? कोणते पुण्याचे काम मी केले आहे? पण तरीही देवा दया करून तुझा अनुग्रह होऊ दे व तुझ्या चरणांची भक्ती करता येऊ दे एवढीच कृपा कर!