प्रत्येक मासाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात, तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तसे असूनही हिंदू पंचांगानुसार प्रत्येक दिवसाला विशिष्ट महत्व दिलेले असते. पौष मासात मकर संक्रांत वगळता इतर मोठे सण नाहीत, म्हणून या मासाला भाकडमास असेही म्हणतात. तसेच या मासात शुभ कार्ये केली जात नाहीत. मग या मासात नेमके काय करता येईल, तर पुण्यसंचय! यासाठी पूर्वजांनी अनेक व्रत वैकल्यांची आखणी केली आहे. त्यातलेच सोपे पण अनेकांना फारसे माहीत नसलेले व्रत म्हणजे, कामदा विनायकी!
गणपती बाप्पा, ही बुद्धीची आणि इप्सित वर देणारी देवता. विनायकी हा त्याचा दिवस! अशात दुग्ध शर्करा योग म्हणजे कामदा अर्थात इच्छापूर्ती करणाऱ्या योगाची विनायकीला जोड मिळाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी दिलेले व्रताचरण करून पुण्यसंचय करणे इष्ट!
कामदा विनायकीचे नामकरण कसे झाले?
पौष मासात येणाऱ्या विनायकी चतुर्थीला 'कामदा' असे विशेष नाव आहे. श्रीगणेशाला सर्व देवांनी अनुष्ठान करून प्रसन्न करून घेतले. त्यावेळी गणेशाने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण केल्या. शिवाय मदनाला अखिल विश्वात विविध रूपात राहण्यासाठी जागा देऊन मदनपत्नी रतीला सौभाग्याचे दान दिले ते ह्याच दिवशी! त्यामुळे पौषातील विनायकीला `कामदा' हे नाव मिळाले. व्रतकर्त्याने विघ्नेश्वर गणेशाची यथासांग पूजा करावी. मनोभावे प्रार्थना करावी. नंतर एका ब्राह्मणाला तसेच गरजू व्यक्तीला भोजन द्यावे. हे व्रत विधीवत केल्याने विपुल संपत्तीचा लाभ होतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
प्रत्येक महिन्यातील विनायक चतुर्थीला एक विशेष नाव आहे. तसेच गणपतीलाही एक वेगळे नाव आहे. त्या विशिष्ट नावाने त्याची ह्या दिवशी पूजा करण्याची प्रथा आहे. नावाप्रमाणेच नैवेद्यातील वैविध्य हे अशा वर्षभराच्या इतर देवतांच्या पूजेतही सांगितलेले दिसते. पौषातील विनायकीला लाडवांचा नैवेद्य आणि लाडवांचे दान सांगितले आहे. लाडवांची संख्या सांगितलेली नाही. त्यामुळे शक्य असल्यास एकवीस अथवा तेवढे शक्य नसल्यास चार किंवा आठ लाडवांचा नैवेद्य दाखवावा आणि तो प्रसाद म्हणून ब्राह्मणाला तसेच गरजू लोकांना वाटावा.