>> रोहन उपळेकर
आज माघ कृष्ण पंचमी. या तिथीला औदुंबरपंचमी असेही म्हणतात. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर, श्रीनृसिंहवाडीच्या पुजा-यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले. म्हणून वाडीला श्रीगुरुप्रतिपदेपासून औदुंबरपंचमी पर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नृसिंहसरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असतो.
आजच्या तिथीला राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम, प.पू.सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांची जयंती असते. आज त्यांची १८७ वी जयंती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावी राहणा-या वे.मू.श्री.अप्पा जोशी व सौ.अन्नपूर्णाबाई या सत्शील दांपत्याच्या पोटी, त्यांच्या अपार दत्तसेवेचे फळ म्हणून, दि. ७ फेब्रुवारी १८३६, माघ कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी बालपणीपासूनच अलौकिक लीला करीत असत.
तरुणपणी ते सद्गुरुभेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले. इकडे श्री स्वामी समर्थ महाराज सारखे, " माझा कृष्णा येणार !" असे म्हणत खुशीत होते. श्रीकृष्ण स्वामी अक्कलकोटाच्या वेशीजवळ पोचले नाहीत तोवरच स्वामी महाराज मठातून घाईने निघाले. लहानग्या श्रीकृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात घुसले. तब्बल सात दिवसांनी हे दोघे गुरु-शिष्य परत आले. त्यानंतर श्रीगुरु स्वामी महाराजांच्या आज्ञेने श्रीकृष्ण सरस्वती स्वामी कोल्हापूरला आले.
श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या लीला अद्भुत आहेत. ते बालोन्मत्तपिशाचवत् राहात असत. ते कुंभार गल्ली मध्ये राहात असत, म्हणून त्यांना " कुंभारस्वामी " असेही म्हटले जाते. त्यांनी श्रावण कृष्ण दशमी, दि.१९ ऑगस्ट १९०० रोजी महासमाधी घेतली. स्वामी ज्या ठिकाणी राहात असत, त्या " वैराग्य मठी " मध्येच त्यांची समाधी बांधण्यात आली.
श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या भक्तांनी त्यांच्याच दृष्टांतानुसार आणखी एक मठ गंगावेशीपाशी बांधला, त्याला " निजबोध मठी " म्हणतात. तेथे स्वामींचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आलेला आहे. त्यांचे सविस्तर चरित्र www.shri-datta-swami.net या साईटवर उपलब्ध आहे.
प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांची श्रीगुरुपरंपरा, श्रीकृष्ण सरस्वती स्वामींपासूनच सुरू होते. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज - प.पू.श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज, कोल्हापूर - प.पू.धोंडीबुवा महाराज, पलूस - प.पू.श्रीकृष्णदेव महाराज, पुसेसावळी - प.पू.श्री. गोविंदकाका उपळेकर महाराज, फलटण - प.पू.बागोबा कुकडे महाराज, दौंड ; अशी ही थोर सद्गुरुपरंपरा आहे.
राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांच्या श्रीचरणीं सादर दंडवत प्रणाम !
श्रीकृष्णसरस्वती दत्ता जय जय कृष्णसरस्वती दत्ता ।श्रीसमर्था जय गुरुदत्ता अनाथांच्या नाथा ।।