छत्रपती शिवाजी महाराजांवर देव, देश, धर्माचे संस्कार घातले ते जिजाऊंनी! त्यामुळे त्यांनी स्वराज्य निर्मितीच्या मोहिमेत या तिन्ही गोष्टींना प्राधान्य दिले आणि रयतेला संतुष्ट व सुरक्षित केले. त्याची सुरुवात त्यांनी पुण्यातील कसबा पेठेतील गणरायचे आशीर्वाद घेऊन केली. आज संकष्टी व शिवजयंतीचा योग जुळून आल्याने इतिहासाची थोडक्यात उजळणी करू.
सततच्या लढायांमुळे आणि मुस्लिमांच्या आक्रमणामुळे बंजर झालेली जमीन आणि आत्मसन्मान गमावलेली रयत, यांच्यात स्फुल्लिंग चेतवले, ते राजमाता जिजाऊ साहेबांनी! पाचाडच्या समाधीस्थळावर राजमाता जिजाऊंसाठी काढलेले गौरवोद्गार म्हणजे जिजामातेच्या तेजस्वी चरित्राचा सारांशच!
तुम्ही नसता तर दिसले नसते मंदिराचे कळस,तुम्ही नसता तर दिसली नसती दारापुढे तुळस,तुम्ही नसता तर नसते भरले पाणवठ्यावर पाणी,सुवासिनींच्या किंकाळ्या मग विरल्या असत्या रानी,तुम्ही नसता तर लागला नसता देवापुढे दिवा,तुम्ही नसता तर लाभला नसता महाराष्ट्राला शिवा!
जिजाऊंचे महाराष्ट्राच्या इतिहासातील स्थान अनन्यसाधारण आहे. त्या केवळ स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता नव्हत्या, तर दीनदुबळ्यांची आणि रयतेचीही माता होत्या.
जिजाबाई कर्तबगार तर होत्याच पण त्यांना शहाजीराजांच्या स्वप्नांचीही पूर्ण कल्पना होती. छत्रपती शहाजीराजे यांनी जिजामाता आणि बालशिवाजीला सुरक्षा हेतूने पुण्यात पाठवले. पुण्यात आल्यावर त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी डौलदार लाल महाल उभा राहत असतानाच, तेथील भग्न मंदिर आणि वास्तूंचा जीर्णोद्धार केला. त्याच कालावधीत जिजाऊंनी कसबा गणेशाचे मंदिर बांधून, पुण्यभूमीत सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याचा अंकुर या मातीत पेरला. कर्नाटकातून आलेल्या ठकार कुटुंबाकडे गणरायाची पूर्जाअर्चा आणि व्यवस्था देण्यात आली. ती आजतागायत अखंड सुरू आहे. या घटना इसवीसन १६४० ते १६४२ या कालावधीत घडल्याचे इतिहास सांगतो. पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. इथून पुढे पुणे शहर आकारास आले. पुण्यात वास्तव्य असताना प्रत्येक मोहिमेपूर्वी महाराज कसबा गणपतीचे दर्शन घेऊन निघत असत.
जिजाऊंच्या कष्टाला आणि शिवबाच्या प्रयत्नाला कसबा गणपतीच्या आशीर्वादाची जोड मिळाली. जिजाऊंच्या मनात स्वराज्याचे स्वप्न बहरू लागले. ते स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केले, स्वराज्याला मंगलतोरण बांधले व परकीय गुलामगिरीतून मातृभूमीची मुक्तता करत भगवा फडकवला.