>> रोहन उपळेकर
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी गावी राहणाऱ्या वे.मू.श्री.अप्पा जोशी व सौ.अन्नपूर्णाबाई या सत्शील दांपत्याच्या पोटी, त्यांच्या अपार दत्तसेवेचे फळ म्हणून, दि. ७ फेब्रुवारी १८३६, माघ कृष्ण पंचमीला श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा जन्म झाला. श्रीकृष्ण सरस्वती स्वामी बालपणीपासूनच अलौकिक लीला करीत असत.
तरुणपणी ते सद्गुरुभेटीच्या ओढीने अक्कलकोटला गेले. इकडे राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज सारखे, "माझा कृष्णा येणार !" असे म्हणत खुशीत होते. श्रीकृष्ण स्वामी वेशीजवळ पोचले नाहीत तोवरच स्वामी महाराज मठातून घाईने निघाले. वाटेत भेटलेल्या लहानग्या श्रीकृष्णाचा हात धरून ते जवळच्या जंगलात घुसले. तब्बल सात दिवसांनी हे दोघे गुरु-शिष्य परत आले. त्यानंतर श्रीगुरु स्वामी महाराजांच्या आज्ञेने श्रीकृष्ण सरस्वती स्वामी पुढील कार्यासाठी कोल्हापूरला आले.
आज औदुंबर पंचमी, आजच्या दिवसाचे महत्त्व आणि सोहळा कसा साजरा केला जातो त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!
श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या लीला अद्भुत आहेत. ते बालोन्मत्तपिशाचवत् राहात असत. ते कुंभार गल्ली मध्ये राहात असत, म्हणून त्यांना "कुंभारस्वामी" असेही म्हटले जाते. त्यांनी श्रावण कृष्ण दशमी, दि.१९ ऑगस्ट १९०० रोजी महासमाधी घेतली. स्वामी ज्या ठिकाणी राहात असत, त्या "वैराग्य मठी" मध्येच त्यांची समाधी बांधण्यात आली.
श्रीकृष्ण सरस्वती स्वामींच्या भक्तांनी त्यांच्याच दृष्टांतानुसार आणखी एक मठ गंगावेशीपाशी बांधला, त्याला "निजबोध मठी" म्हणतात. तेथे श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आलेला आहे.
आमच्या प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराजांच्या श्रीगुरुपरंपरेचे, श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजच प्रथम श्रीगुरु आहेत. राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराज - प.पू.श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज, कोल्हापूर - प.पू.धोंडीबुवा महाराज, पलूस - प.पू.श्रीकृष्णदेव महाराज, पुसेसावळी - प.पू.श्री.गोविंदकाका उपळेकर महाराज, फलटण - प.पू.श्री.बागोबा कुकडे महाराज, दौंड ; अशी ही थोर सद्गुरुपरंपरा आहे.
सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांचे विस्तृत चरित्र www.shri-datta-swami.net या साईटवर उपलब्ध आहे. त्याचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा.
मी आज आम्हांलाच आलेला सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांचा एक सुंदर अनुभव सांगतो. २००८ साली आम्ही काही मित्रमंडळी दोन गाड्या घेऊन प.पू.श्री.गोविंदकाकांच्या गुरुपरंपरेतील दोन महात्म्यांच्या स्थानी दर्शनाला गेलो होतो. फलटणहून पू.काकांच्या समाधीचे दर्शन घेऊन आधी पुसेसावळी येथे गेलो. तिथे सद्गुरु श्रीकृष्णदेव महाराजांच्या समाधीची पूजा करून काही उपासना केली व तिथून पलूस येथे सद्गुरु श्री.धोंडीबुवा महाराजांच्या स्थानी गेलो. त्यावर्षी पू.धोंडीबुवांच्या समाधीचे शताब्दी वर्ष होते. त्यांच्या समाधिस्थानी मनोभावे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण पुढे श्रीक्षेत्र औदुंबर येथे गेलो.
श्रीकृष्णामाईला वंदन करून भगवान श्रीदत्तप्रभूंच्या विमलपादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्यासमोर बसून उपासना केली. दुपार झालेली असल्याचे पोटातील कावळे आठवण करून देऊ लागले होतेच. मग कृष्णामाईच्या काठावरील घनदाट औदुंबर वनात बसून आम्ही जेवायची तयारी करू लागलो. त्यावेळी मी माझा मित्राशी सहज बोललो की, "अरे सचिन, आपल्याला दोन श्रीसद्गुरूंच्या स्थानाचे दर्शन झाले. इथून खरंतर कोल्हापूर काही फार लांब नाही, पण तेवढा वेळ हाती नसल्यामुळे आपण कोल्हापूरला जाऊन सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचे दर्शन काही घेऊ शकणार नाही याचे वाईट वाटते रे !" असे म्हणून मी सहज मागे वळलो आणि आश्चर्याने चकितच झालो. वळून बघतो तर माझ्या मागच्या औदुंबर वृक्षाखाली बांधलेल्या सिंमेटच्या पारावर आमच्याकडे तोंड करूनच, सद्गुरु श्रीकृष्ण सरस्वती महाराजांचा एक छोटासा पण सुंदर फोटो ठेवलेला होता. तिथे जवळपास आम्ही अर्धातास तरी वावरत होतो, पण तेवढ्या वेळात आमच्यापैकी कोणाचेही त्या फोटोकडे लक्ष गेलेले नव्हते. किंबहुना तेथे फोटो नव्हताच तो आधी. आमचा विषय व्हायला आणि त्याक्षणी तो फोटो तिथे दिसायला एकच गाठ पडली. मी धावत जाऊन त्या फोटोला कृतज्ञतेने नमस्कार केला व तो प्रसाद-फोटो उचलून आणला. सगळ्यांना ही घटना सांगितली. सर्वच लोकांना अतिशय आनंद वाटला. या त्यांच्या अनोख्या लीलेतून सद्गुरु श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या 'स्मर्तृगामी' ब्रीदाचे अद्भुत दर्शनच तर आम्हां सर्वांना अत्यंत करुणेने करविले होते. आम्हां प.पू.श्री.गोविंदकाकांच्या लेकरांवरची त्यांची ही कृपा पाहून खरंच डोळे भरून आले. श्रीगुरुपरंपरेतील हे अवतारी महात्मे आजही आपल्यासारख्यांवर कृपादृष्टी ठेवून आहेतच, यात तिळमात्र शंका नाही. आपण मनोभावे व प्रेमाने स्मरण करायचाच अवकाश ; त्यांची कृपागंगा प्रवाहित होतेच होते !
राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्योत्तम सद्गुरु श्री श्रीकृष्ण सरस्वती स्वामी महाराज अशी त्यांची ख्याती होती. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मनोभावे नमस्कार.
श्रीकृष्णसरस्वती दत्ता जय जय कृष्णसरस्वती दत्ता ।
श्रीसमर्था जय गुरुदत्ता अनाथांच्या नाथा ।।