शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
4
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
5
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
6
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
7
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
8
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
9
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
10
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
11
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
12
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
13
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
14
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
15
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
16
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
17
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
18
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
19
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
20
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!

समाजाबरोबर लोकांची मने स्वच्छ करणारे संत गाडगे बाबा यांची आज पुण्यतिथि; घेऊया कार्याचा आढावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 07:00 IST

संत गाडगे बाबा यांच्या ठायी अध्यात्म आणि समाजसेवा याचा सुंदर मिलाफ आढळतो, आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे कार्य सविस्तर जाणून घेऊ.

डेबूजी झिंगराजी जानोरकर हे नाव वाचले, तर व्यक्तिपरिचय होणे कठीण आहे, मात्र गाडगे बाबा म्हणताच व्यक्ती, कार्य आणि त्यांचे समस्त जीवन आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ म्हणत अध्यात्माच्या मार्गातून त्यांनी समाजप्रबोधनही केले. २० डिसेंबर रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने गाडगे बाबांच्या महान कार्याची थोडक्यात तोंड ओळख करून घेऊ आणि त्यांची शिकवण अनुसरण्याचा प्रयत्न करू. 

गाडगे बाबा हे एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भेट देत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधारक आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगेबाबा हे संतामधील सुधारक आणि सुधारकांमधील संत होते. त्यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गाडगेबाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती.

तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. 

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. 

घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. 

त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले. गाडगे महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातील काही स्वच्छ गावांच्या ग्रामपंचायतींना गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार दिला जात असे. 

गाडगे बाबांनी केवळ समाज स्वच्छ केला नाही, तर लोकांची मनेही अंतर्बाह्य स्वच्छ केली. अशा या पुण्यात्म्याने २० डिसेंबर १९५६ रोजी जगाचा निरोप घेतला. परंतु जाता जाता समाजाला आपल्या बहुमूल्य विचारांची देणगी दिली. त्यांना त्रिवार वंदन.