आजची तिथी खास आहे. शुक्रवार त्यात नवमी तिथी, तसेच चंडिका नवमी आणि सीता नवमी या शक्तीच्या दोन्ही स्वरुपांची पूजा व माता लक्ष्मीच्या आगमनार्थ करा अशी आराधना.
आजचा दिवस खास शक्तिपूजेचा म्हटला पाहिजे. शक्तीची पूजा अर्थात चण्डिकेची आणि माता सीतेची पूजा. आरोग्य, ऐश्वर्य, आनंद प्राप्तीसाठी माता लक्ष्मीची उपासना करावी.
ज्याच्यावर माता लक्ष्मीचा कृपाशिर्वाद असतो, त्याला कसलीही कमतरता जाणवत नाही. त्याचा नेहमीच उत्कर्ष होतो. मान सन्मान मिळतो. समाजात आदर मिळतो आणि अडी अडचणींवर मात करण्याची क्षमता येते. म्हणून दर शुक्रवारी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते.
देवीची पूजा शक्यतो सकाळी करावी. परंतु काही कारणास्तव सकाळी पूजा शक्य नसेल, तर सायंकाळी स्नान करून मगच पूजेला आरंभ करावा. दिवा लावावा. फुले वाहावीत. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा आणि लक्ष्मी स्तोत्र किंवा श्रीसूक्ताचे पठण वा श्रवण करावे. आपल्या घरातील, समाजातील, देशातील सुबत्ता कायम टिकून राहावी, सर्वांची प्रगती व्हावी, अशी मनापासून प्रार्थना करावी. कपटरहित केलेली प्रार्थना ईश्वराला प्रिय असते. म्हणून केवळ आपल्यासाठी न मागता समाजासाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी देवीकडे मागणे मागावे. आरोग्य, सुख, शांती, समृद्धी नांदावी अशी देवीकडे प्रार्थना करावी.
माता लक्ष्मीचा श्लोक :
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
अशा रीतीने शक्ती पूजा करावी. तसेच गृहलक्ष्मी अर्थात पत्नी तसेच आई, मुलगी, बहीण अशा सर्व स्त्रीरूपाचा आदर सत्कार करावा. परस्रीला मातेसमान मानावे. तसे केल्याने मनुष्याचे अधःपतन कधीच होत नाही, तर केवळ उत्कर्षच होत राहतो.