कार्तिक शुद्ध चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जाते. हे व्रत श्रावण शुद्ध चतुर्थीलादेखील केले जाते. १८ नोव्हेंबर रोजी दुर्वा गणपती व्रत आहे. गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय असतातच, मात्र, या व्रताच्या दिवशी केवळ दुर्वांनी बाप्पाचे पूजन केले जाते.
दुर्वा औषधी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये दुर्वांना अमृता, अनंता, गौरी, महौैषधि, शतपर्वा, भार्गवी या नावांनी ओळखले जाते. असे म्हणतात, की समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला, तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढाताण झाली, त्या ओढाताणीमध्ये जे थेंब पृथ्वीवर सांडले, त्यातून दुर्वा नामक वनस्पती उत्पन्न झाली. म्हणजेच, ही वनस्पती अमृतासमान आहे.
हेही वाचा : पहिल्या-वहिल्या महिला सैन्यतुकडीचा निर्माता, गणनायक गणाधिपती!
बाप्पाला दुर्वा का आवडतात?पौराणिक कथेनुसार अनलासुर नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता. सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला. बाप्पानी राक्षसाशी तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले. परंतु, त्या विषारी राक्षकाने बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला. बाप्पाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या. तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ गाठी खाण्यासाठी दिल्या. दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला. पोटातला राक्षस मेला आणि बाप्पाचा दाहदेखील शांत झाला. तेव्हापासून बाप्पाने दुर्वांचा हार आपल्या गळ्यात मिरवण्यास सुरुवात केली.
नैवेद्यातही दुर्वांचे त्रिदल महत्त्वाचे:गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात. आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचे पाने ठेवतो, तसे मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते. तसेच, बाप्पाच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो. हार उपलब्ध नसेल, तर २१ दुर्वांची जुडी वाहिली जाते. तीदेखील उपलब्ध नसेल, तर दुर्वांचे त्रिदल वाहिले जाते. दुर्वा अर्पण करताना अनन्यभावे हात जोडून मंत्र म्हणावा,
श्री गणेशाय नम:, दुर्वाकुरान् समर्पयामि!
अशाप्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना केली आणि दुर्वांकुर वाहून बाप्पाचे व्रत केले, तर बाप्पाचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल.
हेही वाचा : ...त्याला जगातील कुणीही इजा करू शकत नाही; गौतम बुद्धांचा शिष्य 'पूर्णा'ची गोष्ट