आपले पूर्वज आपल्याला नेहमी सांगतात, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब' अर्थात आजचे काम उद्यावर ढकलू नका, तर ते आजच करून मोकळे व्हा. जो आपले काम वेळच्या वेळी करतो, त्याच्या वाट्याला सहसा अपयश येत नाही. मात्र जो आळस करून कामाची टाळाटाळ करतो, तो आपल्या स्वप्नांची पूर्तता कधीच करू शकत नाही. आता या मुलाचेच काय झाले पहा ना..
एक विद्यार्थी गुरुगृही राहून विद्यार्जन करत होता. बुद्धीने हुशार असूनही त्याच्या अंगात भयंकर आळस होता. त्याचा आळस कसा दूर करावा हा गुरुजींसमोर मोठा प्रश्न होता. त्याची स्वप्नं मोठी होती परंतु स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत करायची तयारी नव्हती. गुरुजींनी एकदा त्याला कामाला लावायचे ठरवले.
दोन दिवसांसाठी आपण गावाला जात असल्याचे सांगून आपल्याजवळ असलेला पारस त्याच्या हाती देत म्हणाले, 'हा दगड सांभाळून ठेव. हा दगड जो कोणी लोखंडावर घासतो, त्या लोखंडाचे सोने होते. म्हणून अतिशय बहुमूल्य असा पारस जपून ठेव. असे सांगून गुरुजी बाहेरगावी गेले.
शिष्याने तो पारस जपून आपल्या कापडी पिशवीत लपवून ठेवला आणि त्या पिशवीवर डोके ठेवून तो स्वप्न पाहू लागला. गुरुजींनी दिलेल्या दगडाचा आपण वापर करून पाहिला तर? आपल्याला काहीच शिकायची गरज लागणार नाही. आपल्याकडे भरपूर सोने असेल. ते विकल्यावर भरपूर पैसा मिळेल. भरपूर पैसा जमा झाला की आयुष्यभर मेहनतच करावी लागणार नाही. तर आपण या दगडाचा जरूर वापर करून पाहिला पाहिजे.
या विचाराने त्याने तो दगड पिशवीतून बाहेर काढला. पण जवळपास लोखंडी वस्तू नव्हती. लोखंडी वस्तू आणण्यासाठी बाजारात जावे लागणार होते. गुरुजी तसेही दोन दिवस घरी येणार नाहीत. त्यामुळे दीड दिवस छान आराम करून घेऊ आणि उद्या संध्याकाळी बाजारात जाऊन हवे तेवढे लोखंड घेऊन येऊ. अशा विचाराने त्याने छान झोप काढली. दोन दिवस एकट्याने मस्त मौज मजा केली. ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो बाजारात जायला निघाला. पण दुपारचे जेवण जड झाल्याने त्याने आणखी थोडी झोप काढली. शेवटी सूर्यास्ताच्या सुमारास तो बाजारात जायला निघाला. बघतो तर काय, गुरुजी दारात हजर!
गुरुजींना पाहून तो गडबडून गेला, म्हणाला, 'गुरुजी तुम्ही तर उद्या येणार होता ना?'गुरुजी म्हणाले, 'हो, पण माझं काम लवकर आटोपलं म्हणून मी लवकर आलो. तू तो पारस जपून ठेवला आहेस ना? तो मला परत कर. तो सांभाळून ठेवला पाहिजे.'
शिष्याने जड अंत:करणाने तो पारस गुरुजींच्या हाती सोपवला. गुरुजींनी त्याचा चेहरा वाचला. त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप स्पष्टपणे दिसत होता. गुरुजी त्याला म्हणाले, 'तुला कसले दुःख झाले, ते माझ्या लक्षात आले आहे. निदान या प्रसंगातून काहीतरी शिक. पारस हे केवळ निमित्त आहे, खरे सोने करायचे असेल तर संधीचे सोने करायला शिक, तरच आयुष्याचे सोने होईल...'
गुरुजींनी त्यांच्या शिष्याला दिलेला उपदेश आपण सर्वांनीच पाळला पाहिजे. आजचे काम उद्यावर न ढकलता ते आजच्या आज पूर्ण करून प्रत्येक क्षणाचे सोने केले पाहिजे. आयुष्य अशाश्वत आहे. त्यामुळे प्रत्येक संधी दवडू नका. कारण उद्या कधीच उगवत नाही. जे आहे ते आजच, असे समजून प्रत्येक क्षण सार्थकी लावा.