जर तुम्हाला एखादी वस्तू लाभदायक ठरावी असे वाटत असेल, तर ती वस्तू गुरु पुष्यामृताच्या मुहूर्तावर खरेदी करावी. या वर्षातील दुसरा गुरु पुष्यामृत योग २५ फेब्रुवारी रोजी असणार आहे. गुरु पुष्यामृत योगाबद्दल व्यापारी वर्गात खूप उत्साह असतो. कारण, ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात या योगावर खरेदी करतात. सोने, चांदी, रत्न, वस्त्र, वास्तू अशी मोठी खरेदी गुरु पुष्यामृताच्या मुहूर्तावर आवर्जून केली जाते.
गुरु पुष्यामृत योग : ज्योतिष शास्त्रानुसार २७ नक्षत्र असतात. त्यात पुष्य नक्षत्राला विशेष महत्त्व आहे. या मुहूर्तावर खरेदी केली असता भरभराट होते.आपल्या कार्यावर शुभ अशुभ प्रभाव पडण्यास ग्रहस्थिती देखील थोड्याफार प्रमाणात कारणीभूत असते. पुष्य नक्षत्राचा गुरुवारी जुळून येणारा योग महाफलदायी मानला जातो. तंत्र, मंत्र, यात्रा, प्रवास, परदेश गमन, ज्ञानार्जन यासाठी गुरु पुष्यामृताहून अधिक चांगला मुहूर्त नाही.
या वर्षातील हा योग दुसऱ्यांदा जुळून आला आहे. २४ फेब्रुवारी दुपारी १२.३० पासून २५ तारखेला दुपारी १. १८ मिनिटांपर्यंत हा योग आहे. जर काही कारणास्तव उद्या खरेदी करणे शक्य नसेल, तर आजही खरेदी केली तरी चालू शकेल. कारण गुरुपुष्यामृताचा अवधी सुरु झाला आहे.
विशेष मुहूर्त : तुम्ही, जर मोठी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पंचांगानुसार २५ तारखेला सकाळी ६.५५ मिनिटांपासून दुपारी १. १७ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. त्यालाच अमृत सिद्धी आणि सर्वार्थसिद्धी योग असेही म्हटले आहे.
गुरुपुष्यामृताच्या दिवशी पूजा : या दिवशी देवी लक्ष्मी, गणपती, कुबेर यांची पूजा करावी. तसेच गुरु अर्थात दत्त गुरूंची उपासना करावी. तसे केल्याने ज्यांच्या कुंडलीत गुरुदोष असतो, तो दूर होतो आणि गुरूचे पाठबळ लाभते. तसेच ज्यांना प्रगतीत अडथळे येत असतील, त्यांनी पिवळ्या वस्तूचे किंवा पदार्थाचे दान करावे. गरजवंतांना दान केल्यामुळे गुरुची कृपादृष्टी लाभते. दुःख, दारिद्रय यांचा नाश करून संतती, सन्मती, संपत्ती देणारा गुरुपुष्यामृत योग म्हणूनच अतिशय लाभदायक असतो. विवाह कार्य वगळता अन्य सर्व प्रकारची मंगलकार्ये या मुहूर्तावर करता येतात. उपासनेला विष्णू भक्तीची जोड दिली, तर वैभव प्राप्ती होते, असे म्हणतात. अशा रीतीने गुरुपुष्यामृताच्या दिवशी सत्कर्मात आपल्या श्रमांची गुंतवूणक करा. फळ आपोआप मिळेल.