आज १७ मार्च रोजी विनायकी चतुर्थी आहे. प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. याप्रमाणे वर्षभरात चोवीस चतुर्थी येतात आणि दर तीन वर्षांनी अधिक मासात आणखी दोन चतुर्थी वाढून त्यांची संख्या २६ इतकी होते. सर्व चतुर्थीचे महत्त्व वेगवेगळे आहे. दर महिन्यात अमावास्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात तर पौर्णिमे नंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात.
विनायकी चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. ही तिथी दर महिन्यात येते, परंतु भाद्रपदात येणाऱ्या चतुर्थीला विशेष महत्त्व असते. कारण ती तिथी गणपतीची मूळ जन्मतिथी आहे. अनेक ठिकाणी गणेश चतुर्थी 'वरद विनायक चतुर्थी' आणि 'गणेश चतुर्थी' या नावांनी ओळखली जाते.
चतुर्थीला गणेशाची विधी विधान पूजा केली असता सर्व प्रकारचे संकट दूर होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच या दिवशी केलेल्या पूजेचे शंभर पट पुण्य मिळते.
फाल्गुन मासात शुक्ल चतुर्थीची तिथी १६ मार्च रोजी रात्री ८ वाजून ५८ मिनिटांनी सुरु होऊन १७ मार्च रोजी रात्री ११. २८ मिनिटांपर्यंत असणार आहे.
पूजेचा मुहूर्त १७ मार्च रोजी सकाळी ११. १७ मिनिटांपासून दुपारी १. ४२ मिनिटांपर्यंत असणार आहे. पूजेचा अवधी एकूण २ तास २४ मिनिटे असणार आहे.
विधी : गणेशाच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे गंध, अक्षता, फुलं वाहून पूजा करावी. अथर्वशीर्षाचे ७,११ किंवा २१ वेळा पठण किंवा श्रवण करावे. जास्वदांचे फुल, दुर्वा गणरायाला वाहून मनोभावे पूजा करावी आणि संकटातून मार्ग दाखवावा अशी विनंती करावी.