आषाढ शुक्ल चतुर्थीला येणाऱ्या विनायकी चतुर्थीला शयनाख्या चतुर्थी असे नाव आहे. या दिवशी शयन करणाऱ्या अनिरुद्ध रूपातील गणेशाची मूर्ती झापोळ्यावर ठेवून तिची यथासांग पूजा करावयाची असते. ही पूजा मध्यान्हकाळी करावी. सर्व देवांनी झोपाळ्यावर शयन करत असलेल्या गणेशाची आणि त्याच्या पत्नीची पूजा याच दिवशी केली जाते. `जो कोणी झोपाळ्यावर बसलेल्या माझी पूजा करेल त्याला मी प्रसन होऊन सुखसमृद्धीसह मोक्ष देईन' असा वर गणेशाने गणेश पुराणात दिला आहे. आजच्या दिवशी संन्याशाला अथवा गोरगरिबांना भोपळा दान करतात.
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. म्हणजेच पुढील चार महिने देव झोपी जातात. देवांना विश्रांती मिळावी म्हणून भक्तांनी देवाची व्यवस्था लावून दिली आहे. परंतु, सगळेच देव झोपी जाऊन कसे चालेल? म्हणूनच बहुदा आषाढी एकादशीच्या आधी येणाऱ्या विनायकी चतुर्थीला गणपती बाप्पाला विश्रांती देण्याचे भक्तांचे प्रयोजन असावे. जेणेकरून एकादशीपर्यंत आराम करून बाप्पा उठतील आणि बाकीच देव विश्रांती घेतील.
गणपतीची सर्वच रूपे मनमोहक, आनंददायी आहेत. झोपाळ्यावर विश्रांती घेणाऱ्या गणेशाचे रूपही असेच नेत्रांचे पारणे फेडणारे आहे. त्यानिमित्ताने या मंगलमूर्तीचे आगळेवेगळे रूप डोळ्यास साठवून देवाला विश्रांती घेण्यास सांगावे. मात्र, देवाला विश्रांती देताना आपल्याकडून कोणते पातक घडणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. आपण जसा देवावर भार टाकून निश्चिंत होतो, तसेच कधी कधी देवालाही भक्तांवर भार टाकण्याची संधी जरूर द्यावी. त्याचीच सुरुवात म्हणून ही शयनाख्या चतुर्थी!
बाप्पा मोरया!