वाडवडिलांची पुण्याई वंशजांच्या कामी येते. ही पुण्याई कधी प्रतिष्ठेची असते, तर कधी मान सन्मानाची, तर कधी आर्थिक स्वरूपाची किंवा अनुभवाची! आजही आपल्याला आपल्या पूर्वजांकडून अनेक गोष्टी वारसाहक्काने मिळतात. परंतु, हक्क म्हटल्यावर अधिकार आला आणि अधिकार मिळवताना कर्तव्याची जाणीव नसेल तर काय उपयोग? यासाठी एका शेतकऱ्याने आपल्या मुलाला सांगितला पुढील उपाय...!
एक शेतकरी होता. अतिशय मेहनती होता. त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर घरसंसार चालवला होता. मुलाचे पालनपोषण केले. शिकवले, वाढवले आणि आता त्याने घराची जबाबदारी स्वीकारावी असे त्याला सांगितले. परंतु, मुलगा अतिशय आळशी होता.
मुलाने आजवर वडिलांची मेहनत पाहिली होती. परंतु त्याची कष्ट करायची अजिबात तयारी नव्हती. त्याला नेहमी अचानक धनलाभ झाल्याचे स्वप्न पडत असे.
एक दिवस तो वडिलांना म्हणाला, `तुम्ही शेतीत कष्ट घेण्यापेक्षा व्यापार केला असता, तर आज मला कष्ट करावेच लागले नसते. वारसाहक्काने तुमची कमाई मला मिळाली असती. खजिना मिळाला असता. पण नाही. तुम्ही स्वत: कष्ट केले आणि आता मलाही कष्ट करायला भाग पाडत आहात.
यावर शेतकरी म्हणाला, `बाळा, खजिन्याचे काय घेऊन बसलास, तो तर तुला मी आताही देऊ शकतो. जो मला माझ्या वडिलांनी दिला होता. आता तो मी तुला देतो.'
मुलगा सुखावला. कानाचे द्रोण करून वडिलांचे शब्द ऐकू लागला. शेतकऱ्याने त्याला एक ठिकाण सांगितले. तिथे एक डोंगर आहे आणि डोंगरावर एक देऊळ आहे. त्याच्या मागच्या बाजूला धनाची पेटी पुरलेली आहे.
हे शब्द ऐकले आणि मुलाला एवढे स्फुरण चढले की आनंदाच्या भरात तो निघालासुद्धा! मनातल्या मनात तो भविष्याची स्वप्न रंगवू लागला. परंतु त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याला एवढी मेहनत घ्यावी लागली, की खजिन्याचा विचारच त्याच्या डोक्यातून निघून गेला. डोंगरावर पोहोचणे हेच त्याचे ध्येय बनले.
वाटेत त्याला अनेक लोक भेटले. त्यांची मदत घेत घेत तो प्रवास करत होता. वळचणीचे पैसे संपले. वाटेत मिळेल ते काम पत्करून त्याने थोडीफार कमाई केली. तो अनुभव त्याला बरेच काही शिकवून गेला. मजल दरमजल करत तो डोंगरावर पोहोचला. देवीचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या पाठीमागे पोहोचला. तिथे जाऊन मागचा सबंध परिसर पाहून तो देहभान विसरला. एवढे निसर्गसौंदर्य त्याने याआधी कधीच पाहिले नव्हते. आपल्या वडिलांनी सांगितला, तो खजिना बहुदा हाच असावा.
खजिन्याच्या शोधात निघालेल्या मुलाला लोकसंग्रह, स्वमेहेनत, निसर्गासौंदर्य आणि बदललेला दृष्टीकोन अशी अनुभवाने भरलेली खजिन्याची पेटी सापडली. मुलाने परत येऊन वडिलांचे आभार मानले. कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि भविष्यात आपल्या मुलालाही हा खजिना द्यायचा, असे त्याने ठरवून टाकले.