बर्फाचे शिवलिंग म्हटल्यावर पहिले आठवते ते अमरनाथ येथील शिवलिंग. आयुष्यात एकदा तरी अमरनाथ यात्रा करावी आणि भोले बाबांचे दर्शन घ्यावे अशी सर्व भाविकांची इच्छा असते. परंतु आजवर तिथे जाणे झाले नसेल तर काळजी करू नका, बाबा भोलेनाथ बर्फाचे शिवलिंग घेऊन नाशिकच्या त्र्यंबकेश्वरात प्रगट झाले आहेत. हा चमत्कार ६० वर्षांपूर्वी अर्थात १९६२ मध्ये भारत चीन युद्धानंतर घडला होता असे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर आता अलीकडेच त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि भक्तांची दर्शनासाठी रीघ लागली.
सोरटी सोमनाथ, श्रीशलि, महांकालेश्वर, ओंकारमांधता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औंढ्या नाननाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. याशिवाय नेपाळमधील पशुपतिनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग मानले जाते. ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर भागात आहेत. एवढ्या मोठ्या आपल्या देशातील लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील, पण आपली संस्कृती एक आहे. अन ती म्हणजे भारतीय संस्कृती. याची प्रतीके म्हणजे ज्योतिर्लिंगे! एकराष्ट्रीयत्त्वाची ती एक खूण म्हटली पाहिजे. मानवांना प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाशी निगडीत काही कथा आणि वैशिष्ट्ये आहेत.
ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती म्हणजे तेज. ज्योती म्हणजे ज्ञान. ज्योती म्हणजे प्रेरणा. ज्योती म्हणजे चेतना. या सर्व शक्तिरूपी शिवाचे प्रतीक, संस्कृतात त्याला लिंग असे म्हणतात, तेच ज्योतिर्लिंग!
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिकजवळच्या गोदावरी किनाऱ्यावरील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की या मंदिरात ३ शिवलिंगांची पूजा केली जाते, जे ब्रह्मा, विष्णू आणि शिव म्हणून ओळखले जातात.मंदिराजवळ ३ पर्वत आहेत, ज्यांना ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि गंगा द्वार म्हणतात. ब्रह्मगिरी पर्वत हे भगवान शिवाचे रूप आहे, निलगिरी पर्वताला निलांबिका देवी आणि दत्तात्रेयाचे मंदिर आहे आणि देवी गोदावरी मंदिर गंगा द्वार पर्वतावर आहे.
तीन डोळ्यांच्या शिव शंभूच्या उपस्थितीमुळे हे ठिकाण त्र्यंबक (तीन डोळे) म्हणून ओळखले जाऊ लागले. उज्जैन आणि ओंकारेश्वर प्रमाणे त्र्यंबकेश्वर महाराज हे येथील राजा मानले जातात. अशा ठिकाणी केलेली पूजा, शांती अतिशय प्रभावी ठरते व आयुष्यातील अडथळे दूर होतात, असा भाविकांचा अनुभव आहे.
अशा या पावन स्थळी भोलेनाथांनी घडवलेला चमत्कार भाविकांसाठी नक्कीच सुखद अनुभूती देणारा ठरेल. हर हर महादेव!